कॉ.यादवराव गायकवाड यांना अखेरचा लाल सलाम -NNL

लाल बावट्यात लपेटलेल्या पार्थिवास दिली गोवर्धन घाट येथे पक्षाच्या वतीने सलामी


नांदेड| दिनांक २२ जुलै रोजी रात्री ११:३० वाजता एमजीएम कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथील राहिवासी कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय १०५ वर्षे होते. त्यांच्या पशच्यात पाच मुली आणि एक मुलगा असून नातू पंतू असा परिवार आहे.

ते मुळचे ढाणकी ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील असून  नंतर ते वझरा (शेख फरीद) ता. माहूर जिल्हा नांदेड येथे स्थायिक झाले होते आणि सद्यस्थितीत ते नांदेड येथील राहिवासी होते. अत्यन्त धाडसी आणि स्वाभिमानी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

सावंत्र्यपूर्व काळापासून शेवटच्या श्वासासापर्यंत ते लाल बावट्याचे खंदे समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते होते. कार्ल मार्क्स आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ते आदर्श मानत तर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या लाल झेंड्यावर त्यांची निष्ठा होती. सुरवातीला शेतकरी कामगार पक्ष नंतर भारतीय काम्युनिस्ट पक्ष आणि शेवटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असा त्यांचा जीवनप्रवास राहिला आहे.

त्यांच्या पक्ष निष्ठेमुळे आणि वैचारिक चर्चेतून त्यांच्या घरातील आजघडीला १५ जन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील साधारणता २० ते २५ व्यक्ती पक्षाचे हितचिंतक आहेत. त्यांच्या कुटूंबियांनी नांदेड मध्ये अनेक यशस्वी आंदोलने केल्याची नोंद आहे.

कॉ.यादवराव गायकवाड यांचे पुत्र कॉ.गंगाधर गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड शहर कमिटीचे सचिव आहेत तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) राज्य कमिटीचे सदस्य आणि नांदेड जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी आहेत.त्यांच्या सुनबाई अ.भा. जानवादी महिला संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्ष आहेत. तर पुतणी अ.भा.जनवादी महिला संघटनेची नांदेड जिल्हा निमंत्रक आणि सिटू संलग्न घरकामगार संघटनेची कार्याध्यक्ष आहे. नातू कॉ. जयराज करण गायकवाड हा डीवायएफआय युवा संघटनेचा नांदेड शहर निमंत्रक आहे.तर दुसरा नातू सचिन वाहूळकर हा एसएफआय चा कार्यकर्ता असून पक्ष सभासद आहे.त्यांची मुलगी सुंदरबाई वाहूळकर ही सन २००५ पासून पक्ष सभासद असून अ. भा.जनवादी महिला संघटना व सिटू संलग्न असंघटित कामगार संघटनेची पदाधिकारी आहे. त्यांचे नातू SFI आणि DYFI संघटनेत सक्रिय आहेत.त्यांची नातवंडे,सुना,मुली,पुतणे असे बहुसंख्य जन आज माकप पक्षाचे सभासद व हितचिंतक आहेत.

मार्क्सवादावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड निष्ठा असलेला आणि क्रांतिकारी भविष्य मांडणारा कम्युनिस्ट योद्धा आज आम्हाला सोडून गेल्याचे शोक संदेश अनेक चलवळीतील पुढाऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधी समयी व्यक्त केले आहेत.बजरंग कॉलनी येथून अंत्ययात्रा निघाल्यावर कॉम्रेड यादवराव गायकवाड अमर रहे, कॉम्रेड यादवराव गायकवाड को अखेरका लाल सलाम अशा घोषणा देण्यात आल्या.

शांती धाम गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.त्यांच्या पार्थिवावर लाल झेंडा ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या पार्थिवा शेजारी लाल झेंडा उभारून त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.ही जबाबदारी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता श्याम कांबळे यांनी त्यांचा शोक संदेशपूर्ण करीत पार पडली.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे,जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम,कॉ.विनोद गोविंदवार,कॉ. किशोर पवार, कॉ. मंजुश्री कबाडे, कॉ.प्रल्हाद चव्हाण आदींनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.

बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ऍड.अविनाश भोशीकर, प्रा. राजू सोनसळे,साहेबराव गुंडूले, साहेबराव गजभारे, कॉ.दिगंबर घायळे आदींनी श्रद्धांजली कार्यक्रमात शोक संदेश व्यक्त केलेत. कॉ.यादवराव गायकवाड यांना त्यांच्या पार्थिवास त्याचे पुत्र कॉ. गंगाधर गायकवाड यांनी अग्नी दिला. तर त्यांच्या भगिनी प्रयागबाई लोखंडे,इंदिराबाई टेंबरे,कॉ.सुंदरबाई वाहूळकर, सुनीताबाई लिंगायत आदींही सोबत होत्या. लालबावट्यास सलामी देऊन अंत्यविधी परपडल्याची बहुतेक नांदेड मधील पहिलीच घटना आहे अशी चर्चा गोवर्धन शांती धाम येथे सुरु होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी