गावातील हनुमान मंदिरासह अनेक दुकाने पाण्यात गेली
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ - मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आल्याने लाखाडी नदीही दुथडी भरून गेली आहे. या पुराच्या पाण्याने मौजे कामारी गावाला वेढा घातला आहे. या ठिकाणी लाखाडी, कयाधू आणि पैनगंगेचा संगम असल्याने गावातील हनुमान मंदिरासह अनेक दुकाने पाण्यात गेली आहेत. एवढेच नाहीतर पुराच्या पाण्याने परिसरातील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापूस, हळद उसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत एकही पुढार्यांनी किंवा महसूल अधिकारी कर्मचारयांनी गावाला भेट देऊन साधी विचारपूस देखील केली नसल्याने शेतकरी, नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
पैनगंगा नदीच्या या पुराच्या पाण्याने बाजूलाच असलेल्या पिंपरी गावच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून, वीरसनि आणि कामारीच्या मध्यभागी असल्याने पिंपरी गावचा दोन्ही गावाशी संपर्क तुटलेला आहे. या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहाचे साहित्यासाठी पुरातून पोहत येऊन मार्ग काढावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता या ठिकाणच्या पुलाची कामे करण्यात येऊन पुन्हा गावचा संपर्क तुटणार नाही यासाठी राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गतवर्षी देखील सप्टेंबर महिन्यात इसापूर धारण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा या कामारी गावात पाणी आले तर पिंपरी गावचा संपर्क तुटला होता. या पाण्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वरून राजा आक्रमक झाल्यामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे.
या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येथील गावात पाणी शिरण्याची भीती असल्याने महसूल पथकाने लक्ष देऊन गावातील नागरिकांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मत संपर्क तुटलेल्या विविध गावच्या नागरिकांनी केली आहे. पुराच्या पाण्याने कामारी गावात येणारे रस्ते बंद झाल्यामुळे काही शेतकरी त्यांच्या शेतात अडकले आहेत, जनावरे देखील शेतात असून, जनावरांचा चारा पुराच्या पाण्यात भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. हि बाब लक्षात घेता हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत शासनाकडून देण्यात यावी, आणि आणि पुरामुळे धोका होऊ पाहणाऱ्या गावाकडे विशेष करून लक्ष देऊन शेतकऱ्यांना व नागरिकांना या पुराच्या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.