सततच्या निसर्गाने शेतीसह अनेक घरांची झाली पडझड; नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील ८ दिवसापासून सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेक्तर शेती व शेकडो घरांचे अंशतः नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज तलाव, कैनॉल, नदीकाठावरील गावच्या नागरीकातून वर्तविला जात आहे. हि परिस्थिती निसर्गाच्या प्रकोपामुळे उद्भवली असून, पिके येण्याची अशा मावळली आहे. असे असताना अद्याप हिमायतनगर महसूल विभागाने याबाबतचा कोणताही अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविला नसल्याने शेतकरी, नागरीकातून प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. आताच्या परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन प्रशासनाने कोणतेही पंचनामे, सर्वे नं करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक, शेतकरी, सर्व सामान्य लोकांकडून केली जात आहे.
मागील १० दिवसापासून सुरु असलेल्या संततधार आणि अतिमुसळधार पावसामुळे आणि वरील नद्या, तलाव व नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेला महापूर आला आहे. यामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केल्याने नदीचे पाणी हजारो हेक्टर शेतीमध्ये आणि परिसरातील गावाला गेल्यामुळे जलमय झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील अंदाजे ५ हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, हळद, ऊस, आदींसह सर्वच पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर नदीकाठावरील १६ गावाला व तलाव आणि नाल्याच्या काठाने पूर आल्याने जवळपास सर्वच गावाला पावसाच्या पुराचा फटका बसल्याने शेकडो घरांचे अंशतः आणि मातीच्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नसली तरी मंगरूळ येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एक गाय दगावली आहे.
सध्या स्थितीत हिमायतनगर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन हि पाण्याखाली आलेली आहे. पळसपूर घारापुर, विरसनी, डोल्हारी, एकंबा, कामारी, सिरपल्ली, कोठा ज. वडगाव, खैरगाव, पवना, मंगरूळ, वारंगटाकळी, हिमायतनगर, रेणापूर, खडकी, टेम्भूर्णी, पावनमारी, या गावाला पुराचा वेढा सुरु झाला असून, अनेक हवंच संपर्क तुटला आहे. पाऊस थाटला तरच पाण्याचा विसर्ग कमी होऊन या गावांना होणार धोका टळेल. अन्यथा या गावातील घराघरात पाणी शिरून मोठे आर्थिक आणि जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही. पुराच्या पाण्यामुळे विदर्भ मराठवड्याचा संपर्क तुटला असून, बोरी, गांजेगांव, सहस्त्रकुंड येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तीन ठिकाणाहून सध्या तरी तुटलेला आहे.
नदीच्या पुराचे पाणी नाल्याच्या मार्गे मागे येत असल्याने अनेक गावचा देखील संपर्क तुटलेला आहे. याबाबत प्रशासनाने सांगितले कि कालचा याबाबत तहसील गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे नदीकाठावरील गावकर्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिला आहे. पावसाचा ओघ चालू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे आणी पूर स्थिती ओसरून पूर्ववत गावचे रस्ते सुरु झाल्यानंतरच बाहेर पडावे अशी माहिती तलाठी पुणेकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.
दरम्यान शेतकरी वर्गातून नुकसानीच्या बाबतीत प्रशासनाचा हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत आहेत. पावसाची संततधार सुरूच आहे. अश्यात राहून राहून जोरदार ठोक पडत असल्याने पाणी पातळी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे सर्व पाणी नदीत जाऊन मिसळत असल्याने पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून, हजारो हेक्टर शेतजमिनी खरडून जाऊन पिके उध्वस्त झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात आम्हाला पाण्यासाठी आंदोलने, उपोषणे करून देखील तरसावे लागते आणि पावसाळ्यात पाण्याने आमची माती होते अश्या संतापजनक भावना व्यक्त करत अनेकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला आहे.
कॅनॉलच्या अधिकाऱ्यावर बेजाबदार पणा व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार
टेंभुर्णी येथे पावसाच्या पाण्यापेक्षा कॅनालच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले असून, कैनॉलचे काम करताना अर्धवट व बोगस काम झाले. तसेच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, येवढेच नाहीतर याबाबत अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून साइटवर दाखवून सुद्धा पावसाळ्यापूर्वी कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे टेंभुर्णी येथील कॅनालच्या कडेच्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या बाबत शेतकर्यांची चर्चा केली असता विलास पाटील, संतोष पाटील, रामराव देवसरकर, दत्ता पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी कॅनॉलच्या अधिकाऱ्यावर बेजाबदार पणा व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करायचे ठरवले आहे.




