मुंबई| शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून आपल्यासह ४० आमदार घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिंदेच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याचे पुढे येत आहे.
तसेच श्रीकांत शिंंदे यांना थेट केंद्रात मंत्रीपद देण्याचीही ऑफर दिली गेली आहे. शिवाय बंड करणा-या आमदारांना मंत्रीपदे आणि महामंडळे देऊन खूश करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आज किंवा उद्या एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रं देणार असून, फडणवीसांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रत्येक हालचालीकडे राज्यातील सर्वांचचं लक्ष लागलं आहे.
सध्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदासह १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे आहेत. भाजपने एकनाथ शिंदे यांना १४ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर देण्यात आली आहे. मात्र, शिंदेंना गृहमंत्रीपदही हवं आहे. परंतु, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचं आहे. त्यामुळे शिंदे यांना अधिकचं एक खातं दिलं जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं. या शिवाय केंद्रात दोन मंत्रीपदे देण्याचा वायदाही भाजपने शिंदे यांना केला. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे केंद्रात मंत्री होणार असल्याची चर्चा आहे.
दिल्लीच्या बैठकीत सर्व ठरले - विधान परिषदेच्या निकालाच्या दुस-या दिवशी शिंदे यांचं बंड उघड झालं. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी शिवसेनेतील फुटीरतावादी गटाला काय काय देण्यात येईल याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं.
मंत्र्यांच्या खात्यात आदलाबदल - ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते. त्यांना पुन्हा फडणवीस सरकारमध्ये रिपीट केलं जाणार आहे. फक्त या मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहे. शिवसेनेतून फुटल्यानंतर हाती काहीच आले नाही, असे वाटू नये म्हणून या मंत्र्यांना चांगली खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.