ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन
पुणे। ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या 'कला आणि संस्कृती ' विशेष उद्दिष्ट गटाने ' आर्टिस्ट कट्टा ' च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २२ ‘ या चित्र प्रदर्शनात रविवारी व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांना चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी सायंकाळी या प्रदर्शनाचा समारोप झाला.
रविवारी सकाळी ११ वाजता स्नेहल पागे यांनी पोट्रेटचे प्रात्यक्षिक सादर केले. दुपारी ४ वाजता संजय देसाई यांनी जलरंगातील अर्बनस्केप चित्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. सायंकाळी ६ वाजता ' कला- संदर्भ आणि अर्थ ' या विषयावर एमआयटी स्कुल ऑफ आर्टच्या प्रमुख डॉ. श्रुती निगुडकर यांनी संवाद साधला. मिलिंद संत, डॉ. पं.समीर दुबळे, अमिता पटवर्धन, चेतना गोसावी,डॉ. वैदेही केळकर, अस्मिता अत्रे, शिवाली वायचळ यांनी स्वागत केले.ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि. ९ ते १२ जून २०२२ या काळात राजा रवीवर्मा कला दालन, घोले रस्ता, पुणे येथे हे प्रदर्शन सुरू होते. या प्रदर्शनात सुमारे ७० कलाकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे. या गटाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
कला घरात आनंद आणते : डॉ. श्रुती निगुडकर
कलेचे अर्थ आणि प्रकार अनेक आहेत.कला ही घरात आनंद आणते, असे विष्णू धर्मोत्तर ' पुराणा च्या ४३ व्या अध्यायात म्हटले आहे. लोककलेवर अनेकदा भक्ती मार्गाचा प्रभाव असतो. वेगवेगळ्या लोककलांमध्ये साधर्म्य आहे. लोककलेला कमी मानले जाऊ नये.त्यांनाही महत्व द्यावे, त्यांचा अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा डॉ. निगुडकर यांनी व्यक्त केली.