नांदेड/हिमायतनगर। जवळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक आदर्श गाव निर्माण झाले असून, हे गाव माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात आदर्श ठरून गावाचा नावलौकिक वाढवेल असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी केले.
ते हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत जवळगाव ग्रामपंचायत व लोकसहभागातून सात हजार वृक्ष लावून एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना जवळगाव येथुन सुरू करण्यात आली आहे. दि.15 जुन रोजी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून वृक्षाचा प्रथम वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षांचा प्रथम वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पाच हजार वृक्षाचे रोपण करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे वृक्ष दिंडी व माझी वसुंधरा अभियानाच्या घोषणा देत स्वागत केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियानात जवळगाव ग्रामस्थ ग्रामपंचायतची संकल्पना यशस्वी ठरली असून, यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील लक्ष देऊन गाव महाराष्ट्रात आदर्श ठरेल हा मनोदय केला, त्यांचं हे लक्ष नक्कीच पुर्ण होणार असून, जवळगावची हिंदू- मुस्लिम स्मशान भुमी देखील आज या वृक्षामुळे एक आदर्श ठरली आहे.माझी वसुंधरा अभियानात जवळगाव महाराष्ट्रात नावलौकिक ठरून आदर्श गाव होईल असे मत व्यक्त करीत जवळगावचा आदर्श जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतीने घ्यावा असे आवाहन वर्षा ठाकूर -घुगे यांनी व्यक्त केले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे,निलेश बंगाळे विस्तार अधिकारी, धर्मेकर,गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सरपंच प्रतिक्षा पवार, उपसरपंच सुभाष माने, प्रसराम पवार, ग्रामसेवक शैलेश वडजकर, गजानन सुर्यवंशी,राजीव झरेवाड, दिगंबर पाटील,भाऊराव पाटील,नारायण काळे,नितेश पवार,पांडुरंग पाटील,माजी सरपंच गणपत नाचारे,जमील भाई,पत्रकार सोपान बोंपीलवार, दत्ता पुपलवाड,दयाळ गिर गिरी,गोविंद शर्मा, मुख्याध्यापक शिराळे, यांच्यासह जवळगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत गोवंदे यांनी केले तर आभार पवार यांनी मानले.