नांदेड| दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष व बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट व्दितीय वर्ष तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हमखास यशाचा मार्ग म्हणजे तंत्रनिकेतन होय त्यातुन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व उद्योगाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, म्हणुन विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
दहावीच्या गुणांवर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षास व बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्षास प्रवेश दिला जातो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये एक उत्तम करिअर निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. तंत्रनिकेतन मधील व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरु करता येतो. रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, भेल, महावितरण, दुरसंचार विभाग, पाटबंधारे विभाग, तंत्र शिक्षण विभाग इ. सरकारी, निमसरकारी क्षेत्राबरोबरच वाढत्या औद्योगिकी करणाच्या आधुनिक काळात तंत्रनिकेतनमधुन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना खाजगी उद्योग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
तसेच बी.टेक, बी.ई., बी.आर्किटेक्चर, बी.एस्सी व्होकेशनल, बीबीए अशा व इतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासही विद्यार्थी पात्र ठरतो. अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखती मधुन विविध नामांकित कंपन्यातर्फे नोकरीची संधी दिली जाते. मागील वर्षी मराठवाडयातील ग्रामीण व शहरी भागातील जवळपास 1130 विद्यार्थ्यांची निवड परिसर मुलाखती मार्फत झालेली आहे, अशी माहिती सहसंचालक श्री.उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद यांनी दिली आहे.
औरंगाबाद विभागात शासकीय व अशासकीय असे एकुण 57 तंत्रनिकेतने असुन त्यांची 15,040 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व अध्ययन अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासुन नियमात केलेल्या बदलानुसार कोणत्याही शाखेतुन आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनमधील थेट द्वितिय वर्षाच्या सर्व शाखांसाठी पात्र राहील. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिस-या अतिरिक्त प्रवेश फेरीचा अंतर्भाव या वर्षी पासून प्रवेश प्रक्रिेयेत करण्यात आला आहे.
कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई व वडील गमावले आहेत व ज्यांच्याकडे " पीएम केअर्स प्रमाणपत्र " आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रमनिहाय राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेतुन प्रवेश मिळणा-या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येईल. प्रवेशासाठी लागणा-या विविध कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने डॉ.अभय वाघ संचालक तंत्रशिक्षण यांनी प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली आहे.
या वर्षीची तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटीनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटीनी पैंकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येईल. औरंगाबाद विभागात शहरी व ग्रामीण भागात 50 प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असुन त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन तसेच नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या सुविधांचा पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक श्री.उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणी अर्जासाठी https://poly22.dte.maharashtra.gov.in/diploma22/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0240-2334216, 2334769 या क्रमांकावर संपर्क साधावा., असे आवाहन करण्यात आले आहे.