नगरपंचायत सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीने अनेकांच्या आपेक्षेवर पाणी... कारभारणी शिवाय पर्याय नाही...
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज तीसऱ्यांदा आरक्षण सोडत झाली. सोमवार दि.१३ रोजी किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कीर्तिकीरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली फेर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यात ०९ प्रभाग महिलांसाठी तर ०८ ठिकाणी पुरुष उमेदवार अशी प्रभाग निहाय आरक्षण मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी जाहीर केली आहे. ५० टक्के जागा महिलांना आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक इच्छुकांना कारभारणी शिवाय पर्याय राहिला नसून आगामी काळात महिलां राज असणार आहे.
अशी सोडत करण्यात आली असून, यात एकूण ०९ प्रभाग महिलांसाठी तर ०८ ठिकाणी पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहतील. असे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार ताडेवाड, कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर महाजन, माहूर नपचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, बालाजी माळचापुरे, रमाकांत बाच्छे, रत्नाकर डावरे, मारोती हेंद्रे, विठ्ठल शिंदे, बालाजी हरडपकर, श्यामसुंदर पाटील, संदीप उमरे, विठ्ठल बनसोडे, तमजीतखान, शेख मुख्तार,यांच्यासह शहरातील नागरीक, इच्छुक राजकीय लोकांसह पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती.
आता प्रभार रचना प्रसिद्ध झाल्यानंतर हिमायतनगर नगरपंचायतीची निवडणूक लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी दिवाळीपर्यंतचा काळ लागेल असेही काहीजण सांगत आहेत. हि बाब लक्षात घेत अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्टीना साकडे घालत मीच सर्वश्रेष्ठ उमेदवार आहे. असे दाखविण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दाखवून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मागील पंचवार्षिक काळात हिमायतनगर शहरात विकास कामाच्या नावाखाली झालेला उमेदवारांचा विकास पाहता जनता हुशार झाली आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांनी सुद्धा नगरपंचायत आपल्या ताब्यात राहावी यासाठी प्रामाणिक, निर्मळ, निष्कलंक व जनसेवेसाठी पुढे येणाऱ्या सुपरिचित उमेदवारांची निवड करून उमेदवारी दिली तरच पारडे जाड राहील अन्यथा धोबी पछाड होऊन नागरिकांना पटेल तो उमेदवार निवडून देतील असेही मतदारातून बोलले जात आहे.
दुसऱ्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलाकडे जाण्याची शक्यता- दरम्यान दुसऱ्या नगराध्यक्षाचा मान मिळविण्यासाठी धडपडणार्या अनेकांनी विशेष करून येथे उपस्थिती लावली होती. मात्र ज्या प्रभागात आपले प्राबल्य आहे, त्या प्रभागात महिलांना जागा सुटल्याचे लक्षात आल्याने सौभाग्यवतीला निवडणूक रिंगणात आणण्याच्या तयारीत असल्यानं आनंद झाला आहे. तर बायकोला राजकारणात आनु न शकणाऱ्या नेत्यांना दुसऱ्याच्या कुबड्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. आज झालेल्या सदस्य सोडतीवरून दुसऱ्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेलाच सुटेल अशी शक्यता जाणकार राजकीय नेत्यांच्या चर्चेवरून वर्तविली जात आहे.