केळी वाळण्याच्या वाटेवर : पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
अर्धापूर, निळकंठ मदने। तालुक्यातील पार्डी (म ) येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील एक ५ एम .जि .ए .चा ट्रान्सफॉर्मर वादळी वाऱ्यामुळे आठवड्यापुर्वी जळाल्याने शेतीसाठी २४ तासापैकी केवळ तीन तासच दररोज वीजपुरवठा होत असल्याने पिकांना फटका बसत आहे .
अर्धापूर तालुक्यातील पार्डी ( म ) येथे उभारण्यात आलेल्या ३३ के. व्ही उपकेंद्रामध्ये दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत .येथून निमगाव,चोरंबा, देळूब ( बु ) भोगाव,शेणी व पार्डीला वीजपुरवठा केला जातो .३० मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एक ट्रान्सफॉर्मर जळाले आहे .यामुळे शेतीसाठी तीन तास वीजपुरवठा केला जात आहे तर सिंगलफेससाठी तीन तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे .
सध्या जून महिन्यातही तापमानाचा पारा कायम असून सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत .जून महिन्यात एफ्रिल व मे महिन्यासारखी परिस्थिती आहे .अश्या परिस्थितीत पिकांना पाण्याची नितांत गरज आहे .परंतु मागील आठ दिवसापासून शेतीसाठी तीन तासच वीज मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .केळीचे घड वाळण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे .
लोडशेडिंगमुळे केळीवर परिणाम
यंदा मोठ्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली असून सध्या केळीला दोन हजार ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे .मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात घट झाली होती .दोन वर्षांपूर्वी झालेले नुकसान यंदा भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .परंतु मागील आठ दिवसापासून शेतीसाठी फक्त तीन तास वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे .
तापमानाचाही केळीला फटका
जून महिन्याची सुरुवात झाली तरी तापमानात काही फरक बसला नाही .दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चालला आहे .मान्सून येण्यासाठी आणखी काही दिवस शिल्लक राहिले असताना लोडशेडिंगमुळे आणखी भर पडली आहे .केळीला नेहमीच पाण्याची गरज असते मात्र मागील काही दिवसापासून केळीला वेळेवर पाणी मिळत नसल्याने केळीचे घड वाळण्यास सुरूवात झाले आहेत.याविषयी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नवीन ट्रान्सफार्मर लवकर बसविण्याची गावातील माजी सरपंच निळकंठराव मदने,उपसरपंच मारोतराव देशमुख,चेअरमन पंजाबराव देशमुख,गंगाधरराव देशमुख,सरपंच जिजाबाई कांबळे यांनी केली आहे.