भीम जयंतीत डिजे न लावता त्या खर्चाच्या बचतीतून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे गरजेचे -NNL

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांचे प्रतिपादन


नांदेड|
भीम जयंतीत डिजे न लावता त्या खर्चाच्या बचतीतून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी प्रज्ञा करुणा विहार समिती देगांवचाळ नांदेडच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती कार्यक्रमात बोलताना केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी प्रमाणे यंदाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जागतिक बौद्ध परिषद बैकॉक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार समिती देगांवचाळ नांदेडच्या वतीने रविवार दि. 26-6-2022 रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या अखत्यारीतील संपूर्ण राज्यात मुलांसाठी कला संस्कृती व क्रीडा या बरोबरच शिक्षण सक्तीचे केले होते. ज्या मुलांना त्यांचे आई वडील शाळेत पाठवित नव्हते त्यांना एक रुपया दंडाची शिक्षा लागू केली होती. 

शिक्षणाची आवड असल्यानेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा परदेशातून बैरिस्टर होऊन भारतात परतले त्यावेळी छत्रपती शाहू महाराज स्वतः डॉ बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. ही तर गिरणी कामगारांची वस्ती आहे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध शैक्षणिक सोईसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. म्हणून मी आपणास सूचवू इच्छित आहे की, भीम जयंतीत डिजे लावण्यापेक्षा त्याच खर्चातून येथील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्यास हे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील. येथील विद्यार्थ्यांसाठी क्रिडांगण उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. 

या प्रसंगी त्यांच्या शुभहस्ते एनटीसी मिल्स परिसरातील 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी राजेश्वरी सोनकांबळे, नेहा कोंडमुंजा, सुवर्णा हटकर सिद्धांत हटकर, आदित्य कापुरे, सुरज थोरात, मयूर नरवाडे, कावेरी सहजराव प्रचेत सहजराव आणि समिता  नवघडे आणि 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी प्रतिक्षा नांदेडकर, स्वप्निल थोरात, अश्विनी ढगे, प्रशांत थोरात, विवेक कापुरे, रितेश नवरे, अंकुश हिंगोले, गणेश हिंगोले, खुशाल थोरात, श्रुती नवघडे, संदीप सातोरे, अंकिता गोडबोले, ऋतुजा कोकरे, श्रुती थोरात, भूषण हटकर, श्रुती सहजराव यांचा सत्कार पुस्तक वही पेन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त आयु. प्रकाश येवले यांनी भूषविले. यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेवक प्रतिनिधी आयु. रमेश गोडबोले, इंजि. डी. डी. भालेराव, रेल्वे कर्मचारी आयु. प्रशांत झिंजाडे, आयु. निलेश खराटे, आयु सुभाष लोखंडे आयु. कमलेश रणवीर, भगवान येवले, वास्तुशास्त्रज्ञ सुनील हाटकर, गौतम गायकवाड, कपिल थोरात, अनिल निखाते, ॲड मायाताई राजभोज, सौ अनिता नरवाडे, सौ शिल्पा लोखंडे, शोभाबाई गोडबोले, भिमाबाई हाटकर, गयाबाई हाटकर, गिरजाबाई नवघडे, चौत्राबाई चिंतोरे, सुमनबाई वाघमारे यांची होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संयोजक सुभाष लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, युवक युवती महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी