आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज - डॉ. बबन जोगदंड -NNL


नांदेड|
वामनदादांनी पायी प्रवास करून गाण्यांच्या माध्यमातून समाजात आंबेडकरवाद रुजविला. काही लोक बाबासाहेब म्हटलं की प्रसंगी जीव द्यायला तयार होतात तर काही आंबेडकरी विचारांपासून कोसो दूर आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरी पायवाटेवर प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच बरोबर त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. आज आंबेडकरी युवक धम्म चळवळीपासून, आंबेडकरी विचारांपासून दुरावत चालला आहे. अशा युवकांना आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बबन जोगदंड यांनी केले. 

यावेळी सिने अभिनेते उद्घाटक मिलिंद शिंदे, जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, आंबेडकरी चळवळीतील व्याख्यात्या सुषमा अंधारे, भदंत पंय्याबोधी थेरो, महापौर जयश्री पावडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, दशरथ लोहबंदे, उद्योजक गजानन मुधोळ, भीमराव हटकर, स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, निमंत्रक जी.पी. मिसाळे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज गोडबोले, कोंडदेव हटकर आदींची उपस्थिती होती. 

सत्यशोधक फाऊंडेशन आणि मानव विकास संशोधन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कुसुम सभागृहात महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन भारतीय सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष पदावरून पुढे बोलताना डॉ. जोगदंड म्हणाले की, आंबेडकरोत्तर काळात आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचे काम वामनदादांनी केले. 

या चळवळीत आपण सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. जे बाबासाहेबांच्या पुण्याईने गर्भश्रीमंत बनले, मोठ्या हुद्द्याच्या जागा पटकावल्या पण यापैकी जे सामाजिक योगदान देत नाहीत कारण ते सुप्तावस्थेत आहेत.  अशांमध्ये जागृतीचा अंगार पेटविण्याची गरज आहे. ती आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. भगत यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. 

उद्घाटन सत्रातच सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, फुले आंबेडकरी विचारधारा पुरस्कार आणि दशकातील आंबेडकरी जलसाकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  सूत्रसंचालन भीमराव हटकर यांनी केले तर आभार राज गोडबोले यांनी मानले. या सत्राच्या यशस्वीतेसाठी अशोक मल्हारे, प्रभू ढवळे, एन. टी. पंडित, संजय जाधव, नितीन एंगडे, डॉ. राम वनंजे, राहुल गवारे, शंकर गच्चे, बाबुराव पाईकराव, प्रशांत गवळे, रणजीत गोणारकर, नागोराव डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

सांस्कृतिक चळवळीतून समाजसेवा - मिलिंद शिंदे - सिनेमा हे मानवी जीवन जाणिवांचे सांस्कृतिक क्षेत्र आहे. सिनेमाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न झालेला आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी कलावंत तत्पर असतात. त्यामुळे कलेच्या क्षेत्रात राहून जे चांगले करता येईल ते मी करीत राहीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी