तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
चंद्रपूर। जिल्ह्याच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना ब्रमह्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री १० वाजता ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यात सहभागी असलेले नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील व मृद् व जलसंधारण कार्यालय चंद्रपूरचे विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागपुरातील एका बड्या कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने नागपूर व चंद्रपूर येथील मृद् व जलसंधारण कार्यालय येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाच्या केलेल्या कामाचे बिल तथा वितरित केलेल्या कामाच्या बिलाकरिता आणि उर्वरित बंधाऱ्यांच्या कामाची रक्कम वितरित करण्याकरिता मृद् व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील, चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे तथा विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनी संयुक्तपणे ८१ लाख २ हजार ५३६ रुपयांची लाच मागितली.
इतक्या मोठ्या रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदार तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. व लाच मागणीची पडताळणी केली, त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या ब्रह्मपुरी येथील निवासस्थानी ५० लाखांची लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे व त्यांच्या पथकाने मुद्देमालासह पंचासमक्ष लाचखोर अधिकाऱयांना अटक केली.
याचवेळी नागपूर व चंद्रपूर येथे संयुक्त कारवाई करताना कविजित पाटील व विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागपूर व चंद्रपूर येथे अनुक्रमे पोलिस निरीक्षक सारंग मिराशी, पोलिस निरीक्षक सचिन मत्ते, पोलिस निरीक्षक प्रवीण लाके, पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरूनुले व पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या अटकेनंतर पाटील, शेंडे व गौतम या तिघांच्याही घरांची तपासणी करण्यात आली असल्याचे सांगितले जाते आहे.