नांदेड। गेल्या काही महिन्यांपासून नांदेड शहर व ग्रामीण परिसरात अनेकांकडून शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढल्याने, खून दरोडे, गोळीबार असे प्रकार घडत आहेत. या घटनांना आवर घालण्यासाठी अवैद्य शस्त्र जप्त करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
त्यानंतर पोलिसांनी पिस्तुल, तलवारी, खंजर असे शस्त्रास्त्र विनापरवाना बाळगून असलेल्या आरोपीची धरपकड सुरू केली आहे. असाच प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शहरातील एका ऑटो चालकाकडे गावठी पिस्तुल असल्याचे समजल्याने पिस्तुल जप्त करून ऑटो चालकास अटक केली आहे. शहरातील जुना कौठा भागातील मामा चौक येथून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
शहरात महिन्याभरा पूर्वी दि.5 एप्रिल रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी झाडून दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत जवळपास 50 हुन अधिक आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. करण्यात आलेल्या कार्यवाहीत गावठी पिस्तुल, तलवारी, खंजर अशा शस्त्रांचा समावेश आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस हवालदार प्रमोद कराळे हे गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जुना कौठा येथील मामा चौक येथे संशयित ज्ञानेश्वर नरहरी पुंड, वय 35 रा. आदित्य चायनीज समोर, जुना कौठा याला ताब्यात घेतले असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रमोद कराळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑटोचालक ज्ञानेश्वर पुंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे करीत आहेत. दरम्यान, नांदेड शहरात अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू असून दररोज शहरात शस्त्र सापडत आहेत. शेजारील राज्यात काही हजारांत ही पिस्तूल मिळत असल्यामुळे पिस्तूल बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.शहरात त्यामुळे क्षुल्लक कारणावरून देखील झालेल्या भांडणात पिस्तूल काढण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अवैधपणे पिस्तुल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.