स्वा. सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक आणि बांगलादेश यांसारखे देश कुरापती काढत आहेत ! - श्री. नरेंद्र सुर्वे -NNL

स्वा. सावरकर जयंतीच्या निमित्ताने ‘वीर सावरकर यांच्या दृष्टीने सध्याचा भारत’ या विषयावर संवाद !


मुंबई|
स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. 

त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या प्रमाणात कार्य केले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षांत राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विचारांकडे दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप तेजस्वी वारसा लाभलेल्या महान भारताची भूमी चीनने बळकावली आहे, तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारखे छोटे देश कुरापती काढत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘वीर सावरकर यांच्या दृष्टीने सध्याचा भारत’ या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी सुप्रसिद्ध व्याख्याते तथा लेखक श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले की, सावरकर हे नेहमी व्यक्तिगत हिताऐवजी राष्ट्राचे हित आणि राष्ट्राची सुरक्षा यालाच सर्वोच प्राधान्य देत होते आणि यामुळे त्यांना समजणे लोकांना कठीण वाटते. ‘राष्ट्राचे हित पहाणाराच माझा मित्र आणि अहित पहाणारा हा शत्रू’, असे सावरकर म्हणायचे. सावरकर यांच्या चरित्राचा प्रत्येक युवकाने अभ्यास केला पाहिजे. युवकांनी त्यांच्यातील गुण साधण्यासाठी नव्हे, तर राष्ट्र उद्धारासाठी हा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्राचा उद्धार, हेच ध्येय ठेवून समर्पित झाले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेणे, हा आपल्या स्वाभिमान आणि अस्तित्व यांचा हा प्रश्‍न आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. स्वदेशीचे आचारण करून आपण आत्मनिर्भर बनले पाहिजे.

या वेळी ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ या संस्थेचे सचिव अधिवक्ता शुभंकर अत्रे म्हणाले की, विदेशात जाणार्‍या युवकांनी स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रप्रेमाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. स्वा. सावरकर त्यांच्या ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी विदेशात गेले. विदेशात जाणार्‍या युवकांनी मातृभूमीशी निष्ठा कायम ठेवून विद्यांचा उपयोग देशाच्या हितासाठी करावा. जातीजातींत विभागलेल्या हिंदूंना आज एकत्र आणले पाहिजे. धर्मांतरीत हिंदूंच्या ‘घरवापसी’ला महत्त्व दिले पाहिजे.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी