भाजपाच्या ध्रुवीकरणाला भारत जोडोने उत्तर - ना. अशोकराव चव्हाण -NNL

आणखी यशासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे


नांदेड।
जुने धार्मिक मुद्दे उपस्थित करत भाजपा देशात ध्रुवीकरणातून समाजांमध्ये द्वेष पसरवत मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क होत जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठीच्या भारत जोडो अभियानातून भाजपाच्या ध्रुवीकरणाला उत्तर द्यावे, असे आवाहन राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.


तरोडा भागातील भक्ती लॉन्समध्ये रविवारी (दि. २९) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि  पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री अशोकराव चव्हाण मार्गदर्शन करताना बाेलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, बी. आर. कदम, गणपतराव तिडके, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर सौ. जयश्री पावडे, जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर,काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ उपाध्यक्षा डॉ. सौ. मीनलताई  खतगावकर, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, उपमहापौर अब्दुल गफार, जि. प. चे माजी सभापती संजय बेळगे, जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सतीश देशमुख तरोडेकर, बालाजीराव पांडागळे, सुरेंद्र घोडजकर, विलास धबाले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, सौ. अनुजा तेहरा, सौ. वर्षाताई भोसीकर, मंगलाताई निमकर, डॉ. रेखाताई चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ना. चव्हाण म्हणाले, की अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिंतन शिबिर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची आता जिल्हा पातळीपासून अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत घेण्यात येणार असून त्यानंतर जिल्हास्तरावर शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

 नांदेडकरांचा विश्वास आणि तुम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर नांदेडचा गड अबाधित राहिला आहे. या सातत्यपूर्ण यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतानाच आगामी काळात यापूर्वीच्या यशापेक्षा अधिक यश मिळवण्यासाठी काँग्रेसच्या सैनिकांनी तयारीला लागावे. जनसंपर्क वाढवावा. या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या यशावरच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे यश अवलंबून आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपाला 40 टक्के मते मिळतात तर 60 टक्के मत भाजपाच्या विरोधात आहेत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन त्या साठ टक्के मतातील ८० टक्के मते आपल्या बाजूला यावीत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली विकासकामे सर्व सामान्यांपर्यंत पोहाेचावीत, असे आवाहन ना. चव्हाण यांनी केले.

ओबीसी, मराठा समाजाला न्याय देणार
ओबीसी राजकीय आरक्षणात मध्यप्रदेशला एक न्याय तर महाराष्ट्राला एक न्याय मिळाल्याचे सांगत आरक्षण जाण्यास भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप ना. चव्हाण यांनी केला. ओबीसी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी, मराठासह सर्व समाजाला न्याय देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले.

लोकांची ज्याला पसंती त्यालाच उमेदवारी
नामधारींना पदे मिळणार नाहीत. तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदे तसेच त्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल. ज्यांचा मोठा जनसंपर्क आहे, लोकांची पसंती असेल त्यांना उमेदवारी दिली जाईल, असेही ना. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
  
ना. चव्हाण यांच्यासारखा चांगला कॅप्टन असल्याने यश निश्चित-खतगावकर

जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी करोडोचा निधी आणला. यातून विकासाची अनेक कामे पूर्ण झाली. याची माहिती जनतेत पोहाेचवल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता आपल्या पाठिशी उभी राहील. ना. अशोकराव चव्हाण यांच्यासारखा चांगला कॅप्टन आपल्याला मिळाल्याने यश निश्चित आहे. मात्र त्यासाठी तुमचाही परफॉर्मन्स चांगला ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. कोरोना काळातही जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागला नाही. नांदेड शहरासाठी ८०० कोटी तर ग्रामीण भागासाठी ३ हजार ५०० कोटींचा विकास निधी आणला. अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. काही प्रगतीपथावर आहेत तर काही येणाऱ्या काळात पूर्ण होतील. राज्यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात १ लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम ना. चव्हाण यांच्या नावावर आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ना. अशोकराव चव्हाण यांना जितके बळ द्याल, मजबूत कराल तितकी संधी तुम्हाला मिळणार आहे. कठीण परिस्थितीतही नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. हा बालेकिल्ला आगामी काळातही रहावा यासाठी सामूहिक योगदान द्यावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही महिन्यानंतर लागणार आहेत. यासाठीचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. यासाठी संघटनेच्या निवडणुका लवकर घ्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेसची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यचे आवाहनही भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. 

याप्रसंगी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले, की काँग्रेसच्या देश पातळीवरील समितीत ना. अशोकराव चव्हाण आहेत. त्यांनी चिंतन शिबिरात मांडलेल्या सूचना पक्षाने स्वीकारल्या आहेत. ही आपणासाठी अभिमानाची  गोष्ट आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्यासाठीचे नियोजन लवकरच करण्यात येईल. त्यानुसार संघटनात्मक निवडणूक १ ते १० जून या काळात पूर्ण करण्यात येतील. यानंतर संकल्प शिबीर तसेच ९ ते १५ ऑगस्ट या काळात भारत जोडो अभियानाअंतर्गत जिल्हाभरात पदयात्रा काढण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व महापालिकेच्या जागा १० ने वाढल्या आहेत. यावेळीही सर्वाधिक जागा जिकंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकावा असे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी