मान्सूनपूर्व कामाच्या खबरदारीत गाफील राहिल्यास कारवाई अटळ - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर -NNL


नांदेड|
नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह पैनगंगा, आसना, मन्याड, पुर्णा आदी नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वच जिल्ह्यात उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास नेहमीप्रमाणे नदीच्या पात्रात पाणी सोडण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.

याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये लहान-मोठे पाझर तलाव यांची संख्याही अधिक आहे. हे तलाव अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने महसूल यंत्रणेशी समन्वय साधत अधिक दक्षता घेतली पाहिजे. या कामात जर हलगर्जीपणा आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज नांदेड जिल्ह्याची मान्सूम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी विभागनिहाय आढावा घेतांना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदिप कुलकर्णी, जिल्ह्यातील निमंत्रीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व विजा चमकण्याचे प्रमाण व त्या कोसळून अनेक ठिकाणी जीवितहानी होते. ही हानी रोखण्यासाठी प्रत्येकाने अधिक काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर पाझर तलाव नादुरूस्त असतील तर वेळप्रसंगी जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संकट येऊच नये यादृष्टीने सर्वच अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागा संदर्भात असलेली कामे प्राधान्याने पूर्ण केली पाहिजेत. विशेषत: पाझर तलाव यातील गाळ काढणे, सांडव्याच्या ठिकाणी झाडे-झुडपी वाढली असल्यास ती काढून टाकणे, मोठ्या धरणांनी विद्युत विभागाशी समन्वय साधून सर्व यंत्रणा तत्पर ठेवणे याची जबाबदारी व नियोजन काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे. कोणत्याही स्थितीत जिल्ह्यात मान्सूनमुळे जीवीत अथवा भौतिक नुकसान होऊ नये या दृष्टीने अधिक दक्षता घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी