ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, आवृत्ती संपादक अनिल कसबे, सुनील जोशी आणि कालिदास जहागीरदार सन्मानित
नांदेड| येथे डॉ. सचिन उमरेकर आणि धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या नरेंद्र देवेंद्र महोत्सवात पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सुधाकर पत्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखदार वातावरणात थाटात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे, सुनील जोशी अनिल कालिदास जहागिरदार यांना प्रदान करण्यात आला.
कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मोंढा मैदान नांदेड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, डॉ.अजित गोपछडे, डॉ. संतुकराव हंबर्डे, विजय गंभीरे, सतीश सुगमचंदजी शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांनी केले. यावेळी सुधाकर पत्रभूषण पुरस्कार खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र आणि रोख पाच हजार रुपये देऊन ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे, ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी आणि कालिदास जहागीरदार यांचा यथोचित सन्मान करून प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. कोविडमुळे तब्बल दोन वर्षानंतर हा कार्यक्रम झाल्यामुळे आणि देशातील एक गाजलेले कविसंमेलन असल्यामुळे नागरिक आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी रसिक श्रोत्यांनी मराठी हास्य दरबार या कार्यक्रमाचाही आनंद घेतला.