१२ वर्षांचा नांदेडचा मुलगा 'फ्री फायर' मोबाईल गेमच्या नादात पोहोचला नाशिकला-NNL


नांदेड।
पब्जी या गेमची नक्कल असणाऱ्या 'फ्री फायर' या मोबाईल गेमच्या नादात नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील एक १२ वर्षीय मुलगा नांदेडहून नाशिकला पोहोचला आहे. या घटनेवरून ऑनलाइन गेमचे वेड ग्रामीण भागातील मुलांमध्येही रुजले असल्याचे पाहायला मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हरणाळा या छोट्याशा गावातील एका १२ वर्षीय मुलाला पब्जीची हुबेहूब नक्कल असलेल्या असलेल्या 'फ्री फायर' या गेमचे वेड लागले होते. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण असल्याने शेतकरी पालकांनी या मुलाला अँड्रॉइड फोन घेऊन दिला होता. 'फ्री फायर' गेमच्या माध्यमातून नाशिक येथील एका मुलाशी त्याची ओळख झाली. आणि या गेमच्या नादात तो नाशिक येथील मुलाला भेटण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हरणाळा येथून सकाळी नांदेड रेल्वेस्थानकावर बसने गेला. तेथून रेल्वे स्थानक गाठून नांदेड रेल्वेस्थानकावरून तपोवन एक्स्प्रेसने तो नाशिक रोड येथे पोहोचला.


आपला मुलगा बराच वेळ झाला घरी परतला नसल्याचे पाहून त्याच्या पालकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. पण त्याचा पता लागला नाही. अखेर वडिलांनी कुंटूर पोलिसात आपला मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेज तपासले. हा मुलगा नांदेड रेल्वे स्टेशन येथे पोहचून 'तपोवन' या ट्रेनमध्ये बसल्याचे रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरात निदर्शनास आले. दरम्यान, हा मुलगा नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

मुलाचा मोबाईल सुरू असल्याने त्याच्या लोकेशनवरून त्याचा लवकर शोध घेणे पोलिसांना शक्य झाले. या मुलाला बोलणारा मुलगा त्याचा मित्रच होता की अन्य काही प्रकार या मागे आहे याचा तपास पोलीस करता आहेत. पब्जी गेमवर बंदी आली असली तरी पब्जीची हुबेहूब नक्कल असणारे 'फ्री फायर'सारखे अनेक गेम मोबाइलवर सहज उपलब्ध होत आहेत. हे पाहता मुलांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या गेमबाबत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय आपली मुले अशा गेमच्या नादाला तर लागत नाहीत ना, यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी