हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर शहरासह तालुक्यात मागील काही महिन्यांपासून चोरी, खून, दरोडे, फसवणूक यासह अवैद्य शस्त्र बाळगून शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला असून, हिमायतनगर पोलिसांनी शहरातील परमेश्वर मंदिर परिसरात किरकोळ वादावरून भांडण करत शस्त्राचा वापर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दि 4 मे च्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली असून, या घटनेतील तिघेजण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. यावरून हिमायतनगर तालुक्यात पोलिसांची वचक कमी झाल्याचे शहर व तालुक्यातील सुजाण नागरिकांतून बोलले जात आहे.
दि 4 मे च्या सायकाळी 9 वाजेच्या दरम्यान एका गाडी मध्ये शस्त्र असल्याचे पोलिसांनी कळताच त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून तपासणी केली असता त्यात शस्त्र सापडल्याने दोन आरोपींना गाडी सह अटक केले तर 3 जन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली त्या आरोपी वर हिमायतनगर पोलिसात भा.द.वी. प्रमाणे कलम 160,4/25, 135 मुंबई.पो.आ. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे लोण हिमायतनगर शहर व परिसरातील ग्रामीण भागात पसरत असल्याचे दिसते आहे. या अगोदर हिमायतनगर तालुक्यात व शहरात खून, दरोड्यासह धमकी आणि फसवणूक केल्याचा घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा तपास लावण्यात हिमायतनगर पोलीस अपयशी ठरले असताना दि.4 मे च्या रात्रीला 9 वाजेच्या सुमारास शहरातील परमेश्वर मंदिर रोडवर 500 मीटर अंतरावर शहरा बाहेरील ठिकाणाहून शस्त्र घेऊन आलेल्या काहींनी शहराची सार्वजनिक शांतता भंग करत मारामारी सुरू करून वातावरण दुषित केले होते.
याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच गोंधळ घालणाऱ्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून विजय रामराव जोंधळे, वय 26 वर्ष, किशन सुरेश सूर्यवंशी वय 26 वर्ष रा बोधडी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून बंटी उर्फ रोहित मारोती शिनगारे रा बोधडी, शे मलिक शे मौला, सोनू हनवते, रा हिमायतनगर जी नांदेड हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांच्या जवळुन शस्त्र जप्त केली, तसेच जवळ काही शस्त्र व गाडी मिळाल्याने त्यातील आरोपी विजय रामराव जोंधळे व किशन सुरेश सूर्यवंशी यांना अटक केली. वरील 5 आरोपीनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हिमायतनगर पोलीस डायरीत कलम 160, 4/25, आर्म ऐक्ट अधिनियम 135 मोटार वाहन कायदा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाला चौधरी, बिट जमादार अशोक सिंगांवाड हे करीत आहेत.
या अगोदर हिमायतनगर पोलिसांनी एकास तलवार घेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयात परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडले होते, त्यानंतर शहरात पुन्हा चारचाकी वाहनासह शस्त्र घेऊन येऊन गोंधळ घालून काय घडविण्यासाठी हे लोक आले होते याचा तपास पोलिसांनी करून शहरातील जनतेला सुरक्षित असल्याची हमी द्यावी. आणि अश्या घटनांना आवर घालण्यासाठी येथील ठाण्याला कठोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची धमक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी रास्त मागणी शहर व तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.