नांदेड| नांदेड शहरासाठी जमेल तेवढ्या लवकर पोलीस आयुक्तालय देण्यात येईल. यासाठी मंत्रिमंडळ समोर प्रस्ताव ठेवण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी आले असता घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी नांदेड-परभणी-हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांतील पोलीसांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीला मागील महिन्यात झालेल्या नांदेडमधील बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या घरी भेट दिली. बियाणी यांच्या पत्नीने सांगितलेली सर्व हकीकत मी पुर्णपणे समजून घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात एकूण 36 पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे एका पोलीस अधिक्षकाला एवढा मोठा भार सांभाळून काम करणे अवघड आहे. राज्य शासनाकडे नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव आलेला आहे. त्यावर लवकरात लवकर तो विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवून जिल्ह्यात, नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय आणि नांदेड ग्रामीण पोलीस अधिक्षक असे दोन भाग करण्यात येतील ज्यामुळे जिल्ह्याचा पोलीस दलातील कारभार योग्यरितीने सुरू राहील.
बियाणी हत्या प्रकरणाचा तपास दुसऱ्या यंत्रणेकडे देण्याच्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास लावण्यात सक्षम आहेत. त्यामुळे दुसऱ्या तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास वळविण्याचा प्रश्न उदभवत नाही. नांदेड जिल्हा पोलीस दलाने आजपर्यंत बियाणी हत्याकांड संदर्भाने घेतलेल्या मेहनतीची मी बारकाईने समिक्षा केली असून ते योग्य दिशेने जात आहेत असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरात मोठ्या प्रमाणात खून, दरोडे यासह गंभीर गुन्ह्याची मालिका सुरूच असल्याची माहिती खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. एवढेच नव्हे तर दीड महिन्यात खुनाच्या २६ घटना घडल्या आहेत. त्यानंतरही कायदा आणि सुव्यवस्थेची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी पोलीस आयुक्तालयाची गरज असल्याचे सांगितले.