देवडी येथील बंधाऱ्यातील गाळ उपसण्याच्या कामाचा उद्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ - देशमुख परिवाराच्या प्रयत्नास यश-NNL


देवडी।
सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून आणि न्या. दिलीप देशमुख आणि एस.एम देशमुख यांच्या प्रयत्नातून वडवणी तालुक्यातील देवडी येथे बांधण्यात आलेल्या बंधारयातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राधा बिनोद शर्मा  यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक २२ मे रोजी करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

देवडी येथील दोन नद्यांच्या संगमावर बंधारा व्हावा असे स्व. माणिकराव देशमुख यांचे स्वप्न होते.असा बंधारा झाला तर गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी दूर होईल आणि सारा परिसर सुजलाम-सुफलाम होईल असे माणिकराव देशमुख यांचे सांगणे होते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी न्या.दिलीप देशमुख आणि एस.एम.देशमुख यांनी प्रयत्न केले आणि सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून देवडी येथे सिमेंटचा बंधारा बांधण्यात आला.परिणामतः ज्या विहिरी,बोअरवेल गेली दहा-दहा वर्षे कोरड्या पडल्या होत्या त्या सर्व पाणीदार झाल्या आणि गावातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. 

त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण पसरले होते.मात्र सद्या हा बंधारा आता गाळाने काठोकाठ भरला असल्याने त्यातील गाळ उपसणे आवश्यक होते.सकाळ रिलीफ फंड पुन्हा देवडी ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आणि सकाळने गाळ उपसण्याची देशमुख परिवाराची विनंती मान्य करून गाळ उपसण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम उद्या रविवारी संपन्न होत आहे.

दुपारी ४ वाजता बंधाऱ्यावर गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ होईल.त्यानंतर दुपारी ४.३० वाजता देवडी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांचा रेणुका माता मंदिरात सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन न्या. दिलीप देशमुख, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त तथा स्व.माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि सकाळचे बीड जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख यांनी केले आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी