उस्माननगर, माणिक भिसे। मागील पंधरवड्या पासून सर्वत्र लग्नाचा धुमधडाका मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून वाढत्या उन्हातही पाहुणे मंडळी लग्नासाठी बाहेर गावी जाण्यासाठी बसस्थानक, जीप , ऑटो, गाड्या बांधून वाहणाची धावपळ, गर्दी करून लग्न समारंभस्थळी वेळेवर पोहचण्यासाठी धांदल उडाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विवाह समारंभाच्या तिथी नव्हत्या .मे महिन्यापासून या समारंभाला सुरुवात झाली आहे.जून ,जूलैमध्ये विवाहासाठी तिथी असल्या तरी पावसाळा सुरू होत असल्याने मे मध्येच विवाह करण्यासाठी गडबड आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही मे महिना पावसाच्या तुलनेत अधिक सोयीचा असतो. एप्रिल-मेमध्ये मशागतीचे कामे केली जात असली , तरी विवाहासाठी वेळ मिळतो. खरा पावसाळा जुलैमध्ये सुरू होतो .त्यामुळे मे महिन्यात विवाह समारंभाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. लग्न समारंभाचा मौसम मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.
एकाच दिवशी अनेक ठिकाणच्या लग्नपत्रिका येत आहेत. नेमके आपण कोणाच्या लग्नाला जावे, कोणता पाहुणा नाराज होणार नाही, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वत्र अंगाची लाही लाही प्रचंड उकाडा होत असून जीवाची कासावीस होत आहे .तरीसुद्धा लग्न समारंभाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे.लग्नाची धामधूम अंतिम टप्प्यात आल्याने पाहुण्याची धावपळ व वाहानाची गर्दी रस्त्यावर दिसून येत आहे.