मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ – कान चित्रपट महोत्सवात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख -NNL


मुंबई|
मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.

कान फिल्म फेस्टिव्हलमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक  आणि अभ्यासक अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या  ' कारखानीसांची वारी ', ' तिचं शहर होणं ' आणि ' पोटरा ' या  मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विशेषतः  विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविण्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे. याच कार्यक्रमात कान चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या मराठी चित्रपटांच्या माहितीपत्रकांचे तसेच  बॉलिवूड म्युझियम या चित्रनगरीत सुरू करण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमाच्या फोल्डरचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मसिटीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमानवार यांनी यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण आणि फिल्म सिटीची सविस्तर माहिती दिली.  ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर मंत्री श्री. देशमुख यांनी कान फिल्म मार्केटला भेट दिली आणि ए.आर. रेहमान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ' सिनेमा ऑफ फ्युचर ' या चित्रपटाच्या नव्या तंत्राच्या आविष्काराबाबत माहिती घेतली. मार्केटमधील कन्फडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या बूथलाही त्यांनी भेट दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी