नांदेड भूषण पुरस्काराचे वितरण
नांदेड। पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नरेंद्र देवेंद्र महोत्सवात रविवारी 15 मे रोजी जागतिक कीर्तीचे दर्जेदार कवी हजेरी लावणार आहेत. आज होणाऱ्या कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस हिंदी कविता आणि दिलखुलास हास्याचे फवारे उडणार असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी सांगितले.
कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मोंढा मैदान, नांदेड येथे सुरू झालेल्या आज होणाऱ्या कवीमध्ये जबलपूर येथील हास्य गीतकार सुदिप भोला,इंदोर येथील वीर रसाचे कवी मुकेश मोलवा, साजापूर येथील हास्य व्यंगाचे कवी दिनेश देसी घी, भोपाळ येथील शृंगार रसाचा कवयित्री सबिहा असर यांच्या शृंगार रसाचा कविता आणि कोटा येथील राजेंद्र पवार यांच्या सोबत होणारी जुगलबंदी खूपच रंगणार आहे, नागपूर येथील हास्य व्यंगाचे कवी कपिल जैन ,
स्थानिक कवी संतोष परळीकर हे आपल्या रचना सादर करणार आहेत. या महोत्सवास वेळेवर उपस्थित राहणाऱ्या 10 रसिकांना सोडतीद्वारे सविता अरुणकुमार काबरा यांच्यातर्फे रंगीत टीव्ही मिळणार आहे. दरम्यान दिग्गज नेते, मान्यवर आणि हजारो रसिकांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या महोत्सवात अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा नांदेड भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
नांदेड भूषण पुरस्कारांमध्ये डॉ.हंसराज वैद्य, सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, अॅड. मिलिंद एकताटे, लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात एक विशेष गोष्ट अशी की, उपस्थित राहून न हसण्याचे चॅलेंज स्वीकारणाऱ्या एका रसिक प्रेक्षकांस रोख दहा हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठे कवी संमेलन म्हणून ख्याती मिळविणाऱ्या या नरेंद्र देवेंद्र महोत्सवातील आजच्याही हिंदी कविसंमेलनास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.