नांदेड। शहरातील एमजीएम कॉलेज समोर प्रियदर्शनी शाळेजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय असून तेथे मुख्य रोडच्या कडेला गायकवाड यांची प्लॉटिंग आहे. मागील दहा ते बारा वर्षापासून रोड, नाली, दिवाबत्ती, ड्रेनेज ह्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी घेऊन माकपच्या वतीने महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर अनेक आंदोलने केली आहेत.
परंतु राजकीय व जातीय द्वेषातून तेथे काम करण्यास लोकप्रतिनिधींची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उदासीनता होती. शेवटी तेथील रहिवासी असलेल्या महिलांनी लहान मुलांसह माकपच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आमरण उपोषण केले होते. शेकडो वेळा सिटू कामगार संघटना व माकप च्या वतीने महापालिकेला निवेदने देऊन व वेळोवेळी स्मरण पत्रे देऊन आठवण करून दिली होती.
तेव्हा कुठे सतत दहा ते बारा वर्षाच्या संघर्षानंतर एमजीम कॉलेज समोरील मागासवर्गीय लोकांच्या घरासमोर डांबर रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने व काम उत्कृष्ट व्हावे या दृष्टीने कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी तक्रारी केल्यानंतर काही दिवस ते काम ठेकेदारामार्फत बंद करण्यात आले होते. परंतु चांगले काम व्हावे ही मागणी पुन्हा केल्यामुळे २१ मे रोजी पुन्हा काम सुरु केले परंतु होत असलेल्या कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असून जुन्या रस्त्यावर केवळ दोन इंचाचा डांबरी थर टाकून काम उरकण्यासाठी रोड ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाची पाहणी करण्यास आत्तापर्यंत येथे आले नाहीत व निवडून आलेले लोकप्रतिनिधी देखील या कामाकडे पाठ फिरवित आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सततच्या तक्रारीची दखल घेऊन बंद पडलेले एमजीएम कॉलेज समोरील रोडचे काम सुरू झाले आहे परंतु कामाचा दर्जा हा निकृष्टच असल्याची तक्रार माकपचे सचिव कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची कायम आहे. राहिलेल्या नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात ही मागणी पुन्हा महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे माकपच्या वतीने करणार असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.