नांदेड। नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत. आज शनिवार दिनांक 21 मे रोजी कृषी व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात कृषी विभाच्या 8 तर सामान्य प्रशासन विभागातील 67 अशा एकूण 75 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कृषी विभागातील कृषी अधिकारी पदाच्या विनंतीवरुन 2 बदल्या करण्यात आल्या. विस्तार अधिकारी कृषी या पदाच्या 6 बदल्या झाल्या असून यात प्रशासकीय कारणावरून 3 तर विनंतीवरून 3 जणांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागातील 67 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांच्या विनंतीने 4 बदल्या झाल्या तर वरिष्ठ सहाय्यक पदाच्या 13 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय कारणावरून 1 तर विनंतीवरून 12 बदल्या केल्या. कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 51 बदल्या करण्यात आल्या. यात 14 प्रशासकीय तर 37 बदल्या विनंतीवरुन झाल्या आहेत.
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्हा कृषी अधिकारी तानाजी चिमनशेट्टे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती. उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या सकाळी 10 वाजल्या पासून बदली प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार- शासन निर्णयाच्या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. जिल्हयातील सर्व तालुक्यात असणा-या जागांच्या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्या करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने सार्वत्रिक बदल्या पारदर्शकपणे होत असल्याबद्दल यावेळी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा बुके देवून सत्कार करण्यात आला. पारदर्शक बदल्या होत अससल्याबद्दल सर्व कर्मचा-यांनी आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले आहेत.