पशुधनाची घट झाल्याने ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामे जोरात -NNL

"शेण खताला येतोय 'सोन्याचा भाव" पशुधनात घट झाल्याने खताचा तुटवडा; प्रति ट्रॅक्टर ट्रॉली तीन ते चार हजार रुपयाचा भाव


उस्माननगर, माणिक भिसे।
यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे  अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने उस्माननगर व परिसरातील शेतकरी वर्ग उन्हात जिवाची पर्वा न करता पेरणीपूर्व नांगरणी ,कचरा वेचणी ,व इतर शेत मशागतीची कामे करण्यात मग्न असून काही शेतकऱ्यांच्या उन्हाळी ज्वारी , भुईमूग,शेतात असल्याने घाई करताना दिसत आहेत.

सध्या आकाशात ढग जमा होत असल्याने वातावरणात जास्तच उकाडा जाणवत आहे.वाढत्या उन्हाच्या तिव्रतेमुळे सर्वत्र पाणी पातळी खोल गेल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे.शेतकरी बैलांना जिवापाड जपून त्यांचा सांभाळ करतो.त्यांच्याच मदतीने पेरणीच्या शेतीचे  कामे करून घेतो.पण चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाणी नसल्याने हिरवा चारा नाही त्यामुळे कडबा महाग झाला आहे बैल गाय महेश आदी जनावरे बाजारात विकून शेतकरी मोकळा होत आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली .दुबार पेरणी करूनही पावसाने योग्य वेळी साथ न दिल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक अडचणीत सापडला. त्यातच खताचे वाढलेल्या किमतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. मागील वर्षी शेतकऱ्यांना उधारी व झालेले कर्ज फेडण्या इतपतही  हंगाम न झाल्याने शेतकरी वर्ग परेशान झाला.

यावर्षी हवामान खात्याने पाऊस लवकर व भरपूर प्रमाणात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे खरीप पेरणी काही दिवसावर येऊन ठेपली आहे शेतकरी मोठ्या जिद्दीने भूतकाळ विसरून कटू अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन भविष्याच्या लालसेने भावी जीवनाचे स्वप्न उराशी बाळगून पेरणीचे दिवस डोक्यावर आल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे.चिपाडे वेचणे शेणखत टाकणे वखरणे करणे केरकचरा जाळून टाकणे आदी शेतीची कामे जोमाने सुरू आहेत.आकाशात ढग जमा होत आहेत दिवसात तापमानात वाढ होऊन जास्तच उकाडा जाणवत आहे तीव्र उन्हाच्या उघड यामुळे जीव कासावीस होत असतानाही शेतकरी वर्ग शेतात अकरा वाजेपर्यंत काम करीत आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना पावसाने योग्य प्रमाणात साथ दिली नसल्याने नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कडधान्य व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे कोरडवाहू जमिनीतील खरिपाची पिके ही पावसावर अवलंबून असतात पावसाने साथ दिली तर खरीप हंगाम चांगला , नाही तर पावसाने दगा दिल्यास पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

यावर्षी उन्हाळा अधिक तापल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरणी चा उपयोग सुरू केला त्यामुळे शेतातील कामे लवकर झाली ट्रॅक्टरच्या मागणीमुळे जमिनीची मशागत मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्यानंतर जमिनीतील केरकचरा कडून साफसफाई करून आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत इकडे काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केल्याने शेतात लागणारे बियाणे खत उपलब्ध करण्यासाठी बाजारात शेतकर्‍यांची वर्दळ सुरू झाली आहे त्यात वर्षीप्रमाणे याही वर्षी खत टंचाई जाणवत असल्याने त्याच्या शोधात शेतकरी फिरत आहे..गतवर्षी पावसाने साथ दिली नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागत आहे.

खरीप हंगाम काही दिवसांवर  येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी  पशुधनाची घट झाल्याने ट्रॅक्टरच्या मदतीने शेती मशागतीच्या कामाकडे आपला कल वळविला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकऱ्यांनी यंदा शेणखताचा वापर वाढविला आहे. शेतकऱ्यांकडे पशुधन कमी झाल्याने शेण खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेण खताचे भाव गगनाला भिडले आहेत. या तुटवड्यामुळे सद्यस्थितीत शेण खताला 'सोनेरी दिवस' आल्याचे दिसत आहे.

रासायनिक खतांचे वाढते दर व त्यामुळे होणारा पिकावर परिणाम याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेणखत वापरणे सुरु केले .शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मामध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बानचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होत आहे. शेणखताला मागणी वाढल्याने दरही वधारले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्चही वेगळा द्यावा लागतो आहे.

सध्या ट्रॅक्टर च्या साह्याने शेतीचे कामे होत असताना बैलांचा उपयोग फक्त आंतर मशागत व पेरणी साठी होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उन्हाळी ज्वारी भुईमूग असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे आकाशात ढग दिसून आल्याने शेतकरी जोमाने कामाला लागला आहे.शेती ही बेभरवशाची झाली आहे शेतकर्‍यांनी केलेल्या कामाचा दामाजी शेतीतून निघत नसल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत असून डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे हीच चिंता जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना सतावत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी