नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत संविधान जागर या डिजिटल रथाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण निरिक्षक अशोक गोडबोले, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जयपाल वाघमारे यांची उपस्थिती होती. भारतीय संविधानाचा इतिहास, निर्मिती व भारतीय संविधानाची विशेष माहिती दृकश्राव्य माध्यमातून या डिजिटल रथाद्वारे नांदेड शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोहचविली जाणार आहे.
गुरुवारी दारु दुकाने बंद - नांदेड जिल्ह्यात 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी गुरुवार 14 एप्रिल रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी गुरुवार 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.