नांदेड| मोहाचे रूपांतर प्रेमात आणि अहंकार हा विनम्रतेत बदलला पाहिजे दुःख, चिंता मुक्तीसाठी गुरुबाणी ही मार्गदर्शकाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन गुरू गोविंदसिंघजी स्टडी सर्कल, राजस्थानच्या अतिरिक्त सचिव तथा राजस्थान विद्यापीठ, जयपूरच्या प्राध्यापक, गुरुबाणीच्या चिंतक व्याख्याता डॉ. मनजीत कौर यांनी केले.
‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त’ आणि ‘खालसा पंथाचा स्थापना’ दिवस तथा बैसाखीचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या श्री गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्यावतीने ‘इन्कलाबी पर्व: बैसाखी’ या विषयावर दि. १३ रोजी स. ११:०० वा. आयोजित ऑनलाईन व्याख्यान मालेचे चौथे विचार पुष्प गुंफताना त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. यावेळी श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंग महाजन, ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले, संचालक प्रो. डॉ. दिपक शिंदे, डॉ. परमवीर सिंग, स परमज्योत सिंघ चहेल, सरदार गुरुबचनसिंघ शिलेदार, सरदार रवींद्र मोदी आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. मनजीत कौर म्हणाल्या की, बैसाखी हा आनंदाचं प्रतीक आहे तर खालसा म्हणजे शुद्धता होय. गुरुबाणीतून मानवतावादी दृष्टिकोन सांगितला गेला आहे. गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आपले कर्तव्य आहे. सर्व शीख गुरूंनी आपल्या वाणीतून कर्मकांडावर प्रहार केला. तसेच गुरु नानक यांनी तर अकालातील बंजर जमीन असा कर्मकांडाबद्दल उल्लेख केला असल्याचे मत डॉ. मनजीत कौर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरु गोविंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राचे संचालक प्रो. डॉ. दिपक शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ. अमरप्रीत कौर रंधावा यांनी मानले. यावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमशास्त्र संकुलातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.