नांदेड| लोकाभिमुख प्रशासनाच्यादृष्टीने अनेक कार्यालयांचा सर्व सामान्यांशी निकटचा संबंध येतो. यात भूमिअभिलेख कार्यालयावर भूमापनाच्या कामाची महत्वाची जबाबदारी आहे. भूमापनाबाबत कार्यालयास नवीन तंत्रज्ञान काही प्रमाणात उपलब्ध झाले असून काही तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे मोजणी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. भू मोजणी कामांसाठी आवश्यक ते आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे भूमापन दिन नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी सेठीया, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, हास्य कलाकार रमेश गिरी, भूमि अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
भूमापन दिनाचे औचित्य साधून सर्व भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी या शिबिरातून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासह आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले. हे आरोग्य शिबीर किशनलालजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रेणुकाई हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी कर्मचाऱ्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
यावेळी किनवट येथील बाल कलाकार यांनी ढेमसा नृत्याचे आकर्षक नृत्य सादर केले. भूमि अभिलेख विभागाचा “इतिहास व कामकाज सांगणारे शिलालेख ते डीजीटल अभिलेख” हा लघुपट सादर करण्यात आला. भूमिअभिलेख खात्याचे कामकाज कसे चालते हे याद्वारे जनतेपर्यंत पोहचवणे, कर्मचारी यांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व लोकसहभागासाठी सनदेचे महत्व या विषयावर पथनाटय सादरीकरण करण्यात आले.