नांदेड| शेतक-यांनी आपल्या शेतमालाला जास्तीत-जास्त बाजारभाव मिळविण्यासाठी ब्रॅडींग आणि नियोजन या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक भगवानराव आलेगावकर यांनी येथे सांगितले.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजीत शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑक्शन हॉलमध्ये आज झालेल्या या मेळाव्यास सदाशिवराव तरोडेकर, संचालक श्रीराम कदम, माजी संचालक निलेश देशमुख,व्यापारी प्रतिनिधी गिरीधारीलाल मंत्री, प्रल्हाद काकांडीकर, कृषी अधिकारी संजय चातरमल, पवन काबरा, नागेश येमनेवार, सचिव वामनराव पवार , शेतकरी मधुकरराव वडवळे उपस्थित होते. आलेगावकर पुढे म्हणाले की, या मेळाव्यास केंद्रीय कृषी योजनांविषयी चांगली माहिती देण्यात आली. शेतक-यांचे प्रबोधन करणारे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजेत.
या कार्यक्रमात कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी शेतक-यांच्या १०००० एफपीओ स्थापन करण्याच्या केंद्राच्या लक्ष्यांक योजने विषयी माहिती दिली ते म्हणाले की, १० शेतकऱ्यांनी एकत्र येवून संचालक मंडळ स्थापन करावे व केंद्राकडे कंपनी स्थापण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. या कंपनीस केंद्रसरकार १ कोटी रुपयांपर्यत अर्थसाह्य देते. या कंपनीमार्फत शेतक-यास आपले ब्रँडींग करता येईल व देशभरात कुठेही आपला शेतमाल व प्रक्रिया केलेल्या वस्तु विकता येतील.
कृषी अधिकारी संजय चातरमल, पवन काबरा व नागेश येमनेवार यांनीही कृषी योजनांबाबत शेतक-यांचे प्रबोधन केले. पणन योजनांबाबतही कार्यक्रमात उहापोह करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.पी. पाटील बारसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव वामनराव पवार यांनी मानले.या कार्यक्रमास एस.एस. बा-हाटे, जी.एस. भारसावडे, बी.एस.शेळके, एस.जी.देवडे,दगडू संगेकर, रवि कल्याणकर, बी.व्ही.शिंदे, पतंगे, बबनराव शेळके, विजय मंगनाळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.