मुंबई| दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा लोकांना बसत आहे. दिवसें दिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत आहे. मे महिना आला नाही तरीही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रात तापामानाने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरीही पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती आयएमडीचे अधिकारी केएस होसाळीकर यांनी दिली.
राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान काल 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेलं. यातील सर्वात जास्त तापमान हे अकोला (44.0) व नंतर मालेगाव, चंद्रपूर (43.0) येथे नोंदवलं गेलं.
राज्यातील तापमान पुढीलप्रमाणे - (3 एप्रिल)
पुणे - 39.8°C
जालना - 40.8
नांदेड - 41.2
परभणी - 41.4
चिखलठाणा - 40.6
मालेगाव - 43
नाशिक - 39.6
सोलापूर - 41.6
उस्मानाबाद - 40.7
बारामती - 39.1
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणी पाच आणि सहा एप्रिलला जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. वाढत्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांची गैरहजरी वाढत आहे. यामुळे शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील तापमानाची ही परिस्थिती पाहता, नागरिकांनी कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना तर 31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.