राजस्थान| राजस्थान भागातील कोटा परिसराच्या जवळ असलेल्या चित्तोडगढ जिल्ह्यातील रावतभाटा या गावामध्ये सोमवारी देवा गुर्जर उर्फ देवा डॉनची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.
हि घटना संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता घडली असून, कुऱ्हाड, लोखंडी पाईप आणि दांड्याने देवा नामक व्यक्तीवर ८ ते १० वेळा हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी देवा कोटा बॅरियर येथील नाक्यावर असलेल्या सलूनच्या दुकानात होता. जखमी अवस्थेत देवाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोटामधील गुंड देवा गुर्जरची सोमवारी पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. सलूनच्या दुकानात बसलेल्या देवावर हल्लेखोरांनी हल्ला केला यामध्ये देवा गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोरांच्या टोळीचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. देवाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच ज्या बाजारात देवाची हत्या करण्यात आली ते ठिकाण सील करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवा गुर्जरवर दीड डझनहून अधिक संख्या असलेल्या टोळक्याने हल्ला केला आहे. हिस्ट्रीशीटर देवा गुर्जरने कोटाजवळ असलेल्या रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. पोलिसांनी देवाचा मृतदेह एमबीएस रुग्णालयातील शवगृहात ठेवला आहे. देवाच्या हत्येनंतर गुर्जर समाजात तीव्र असंतोष पसरला असून शवगृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली आहे. यामुळे येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.