बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्त्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील अशिक्षिक जनतेपर्यंत आपल्या कीर्तनाद्वारे सांगणारे, अज्ञानी, भोळ्या भाबड्या शोषित, पिडित व तळागाळात खितपत पडलेल्या जनतेच्या व्यथा, वेदनांना आपल्या कीर्तनाद्वारे वाचा फोडणारे, धार्मिक रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, देवधर्म, विषमता, अनिष्ट प्रथा, जातीभेद, हिंसा व हुंडा पद्धती यावर आसूड ओढणारे हीन-दीन, पददलित जनतेला प्रबोधनाचा डोस पाजून माणूसपण मिळवून देणारे कर्मयोगी, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होत. संत गाडगेबाबा यांचा संबंध जीवनप्रवास लेखक गंगाधर निमलवार यांनी संत गाडगेबाबा जीवन व कार्य या पुस्तकात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा आलेख उभा करणारी बरीचशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गाडगेबाबांची कीर्तन प्रवचने प्रत्यक्षात पाहणारी आणि ऐकणारी माणसे आजही जीवंत आहेत. गाडगेबाबांची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठ्या कष्टाने निमलवार यांनी या पुस्तकात मांडली आहे. तत्कालीन समाजव्यवस्था, चालीरीती, वर्ठी समाजाची मानसिकता, बोलीभाषा, सांस्कृतिक परंपरा आदींचा रितसर धांडोळा घेत विचारप्रवर्तक तितकंच रंजक कथानक डोळ्यांपुढे सरकत राहतं. गाडगेबाबांच्या म्हणजे डेबूच्या कुटुंबाचा सामाजिक परिवेश कसा होता याचं लेखकाने अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने आणि गांभिर्याने लेखन केले आहे. झिंग्राजी म्हणजे डेबूचे वडील शेवटच्या अवस्थेत असतांना खूप हाल हाल होऊन मृत्यू पावले. ते शेवटी म्हणतात, 'मी माझ्या आयुष्याचा वैरी आहे.
दारुच्या, बकऱ्या कोंबड्यांच्या नादी लागून व्यसनाधीन झालो नसतो तर ही वेळ आली नसती. यापायी माझं आयुष्य, संसाराचं वाटोळं झालं. देव देवतांपायी हे सगळं घडलं. झिंग्राजी आपल्या पत्नीला म्हणजे डेबूच्या आईला म्हणतात, सखे, माझ्या डेबूला या दगडाच्या देवापासून, नैवेद्यापासून दूर ठेव. याला त्याचं वारं लावू देऊ नका. डेबूला उद्देशून म्हणतात, डेब्या, बापारे देव हा कुठेच नाही, फक्त आपल्या तळहातात आहे. कारण काम केलं तरच खायला मिळतं. नाहीतर उपाशीपोटी देव आणून देत नाही. तू देवाला न मानणारा झालास तरी चालेल. पण देवाच्या नैवेद्याच्या कोंबड्या - बकऱ्याचा नाद लावून घेऊ नकोस. बरं?' ह्या मृत्यूसमयीच्या उपदेशाने लहानग्या डेबूच्या जीवनाला ऐतिहासिक कलाटणी मिळाली.
पुढे डेबू विवाहबंधनात अडकला पण संसारात रमला नाही. डेबूचं चित्त ठिकाणावर नसायचं. त्याचं मन कुठेच रमत नव्हतं. पोरं बाळं झाली तरी कोणतं सुख, कुठला आनंद डेबूच्या आयुष्यात नव्हता. व्यसनाधीनतेच्या आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत संपूर्ण समाज बुडालेला आहे आणि तो वर कसा होईल हा एकच विचार त्याला सतावत होता. तो भरपूर काम करीत होता. अपार कष्ट उपसीत होता. मनात मात्र समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी परंपरा यांचा विरोधात संघर्ष सुरुच होता. तो सतत अस्वस्थ होत होता. संसारात मन रमेना आणि जीवनात सावकारी पाशाविरोधातही संघर्ष पेटला होता. चंद्रभान मामा कसा सावकाराकडून लुबाडला गेला हे डेबूने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. या धक्क्यातून मामा सावरला नाही. तो गेला पण तरुण रक्ताच्या डेबूच्या मनात असंतोष धुमसत होता. पण तो हतबल झाला होता. डेबूचं शरीर काम करत होतं. पण मन काम करीत नव्हतं. डोळ्यांसमोर एक मुलगा मुद्गल मरताना डेबूने पाहिले होते. आता डेबूत परिवर्तन होत होते. डेबूचा नवा जन्म होत होता. भटकंती सुरू झाली होती. पत्नी कुंता, मुलगा गोविंदा, मुली अलोका, कलावती, आई सखू कौतिकमामी, बळीराम, बळीरामची बायको यांना मागे सोडले. डेबू ते गाडगेबाबा हे स्थित्यंतर आणि त्याची ज्वलंत कहाणी लेखकाने स्वतःचा कस लावून चितारली आहे.
पुढच्या काळात सामाजिक सुधारणेसाठी कीर्तन हेच गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य बनले. आपल्या खेडवळ लाडक्या वर्हाडी बोलीमध्ये तासन्तास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवत. काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून वहायचा. कीर्तनाचा विषय एकच- गरीबांचा आणि दलितांचा उद्धार! बाप्पं हो! देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्यासमोर दरिद्री नारायणाच्या रुपाने प्रत्यक्ष उभा आहे. त्यांचीच प्रेमाने सेवा करा, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र तर गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा. बेघरांना आश्रय द्या, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार करा, दुःखी व निराधारांना हिंमत द्या, बेकारांना रोजगार तर पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या. गरीब तरुण-तरुणींचे लग्न करा, सेवेसारखा दुसरा धर्म नाही. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे. बाबांनी आयुष्यभर हेच समाजकार्य केले. बाबांना देवतांचा बाजार मूळीच मान्य नव्हता. ते म्हणत, देव कधी नवसाला पावत नाही, देव कधी कुणाला डोळ्यांनी दिसत नाही, मनुष्याला जी बुद्धी मिळाली तिचा विकास अवश्य करा.
मुलांना लहानाचे मोठे करा व खूप शिकवा आपल्या बाबासायबावानी. पशूच्या हत्या करुन दगडाच्या देवाला बळी देऊ नका, त्यांनाही आपल्यासारखा जीव असतो, हिंसा करु नये व प्राणीमात्रावर प्रेम करा असा संदेश त्यांनी अनेकदा कीर्तनातून दिला. संत गाडगेबाबांनी दगडांच्या देवाला महत्त्व न देता माणसालाच जास्त महत्त्व दिलेले असून मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे म्हटले आहे. ते मूर्ती पुजेच्या प्रखर विरोधात होते. तसेच अस्पृश्यता, जातीभेदाच्या विरोधात होते. कीर्तनातून बाबा सांगत, बाप्प हो! प्रपंच निटनेटका करा, पण देवाले ईसरु नका, सर्वांचा देव एकच आहे. आपण सारी एकाच देवाची लेकरं आहोत. मानवता हीच आपली जात असं ते आवर्जुन सांगत. आपला हा गरीब, आडाणी समाज परिवर्तीत व्हावा असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांना त्याबद्दल सतत आस्था व तळमळ होती. यासंबंधीची लेखकाची तळमळही पुस्तकाच्या पानापानांतून सळसळत राहते.
अंधश्रद्धा, हुंडापद्धती, देव-धर्म, कर्मकांड, विषमत, रुढी, परंपरा, जातीभेद व हिंसा याविरुद्ध त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घणाघाती हल्ले केले. ते शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि हुंडा विरोधी होते. कर्ज काढून लग्न थाटात करणे, बारसे आणि वाढदिवसावर अमाप खर्च करणे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे आपल्या बहुजन समाजाची धुळधाण होते आणि आपला होणारा विकास खुंटतो असं ते सांगत असत. लहान मुलंाना ते नेहमीच म्हणत असत, मुलांनो तुम्ही खूप शिका, डॉ. आंबेडकरावानी व डॉ. पंजाबरावांसारखं मोठे व्हा, आणि भारताचं नाव जगात उज्वल करा. माया लेकरांनो, शिक्षणाशिवाय मानवजीवन हे पशूतुल्य आहे. फुले-आंबेडकरांना शिक्षणाची महत्त्व कळले म्हणूनच ते महान झालेत. तसेच तुम्ही पण खुप-खूप शिका, आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कीर्तनातून वारंवार असा मौलिक संदेश-उपदेश देत असत. गाडगेबाबांनी हाता खराटा घेऊन अक्षरशः ५० वर्षे जिवंत असेपर्यंत संपूर्ण गाव, खेड्यातील रस्ते, गटारे झाडून साफ केली आणि समाजातील जनतेचे आरोग्य चांगले राखून दीर्घकाळ सेवा केली. सकाळ, संध्याकाळ सारा गाव खराट्याने झाडून स्वच्छ करायचे आणि रात्रीला कीर्तनाद्वारे अज्ञानी जनतेला बोधामृत पाजायचे. असे महान संत आपणांस क्वचितच पहावयास मिळतील. याचे संदर्भ लेखकांनी ठिकठिकाणी दिले आहेत.
आपला संपूर्ण समाज स्वतःच्या कुटुंबासारखा हे विश्वाची माझे घर याप्रमाणे वाटत होता. त्यांनी समाजाची सेवा करीत करीतच आपला देह आयुष्यभर चंदनासारखा झिजवला. हल्लीचे साधु-संत करोडपती आहेत ते व्यावसायिक साधु-संत बनले असून जनतेची सेवा न करता देवाष-धर्माच्या नावाने जनतेला सर्रास लुटून अमाप संपत्ती गोळा करतात आणि अनेक काळे धंदे करुन चैनीचे जीवन जगतात. याबाबतची तुलना लेखकाने केलेली आहे, ती आजच्या बुवा बाबांनी वाचणे आवश्यक आहे. गाडगेबाबांनी मात्र जे रंजले-गांजले, दीन, दुबळे, दुःखी कष्टी, अनाथ, रोगी, महारोगी, निराधार पोरकी लेकरे यांची बाबांनी अहोरात्र सेवा केली. त्यांचा धर्म हा खर्या अर्थाने मानवधर्म होता.
त्यांनी कधी देवाची मंदिरे, साधु-संतांचे आश्रम, मठ बांधले नाहीत. कुणाकडे पैशाकरीता हात पसरला नाही. गायी, वासरे, जनावरांसाठी गोरक्षणे थाटली, पीडीतांसाठी त्यांनी सदावर्ते सुरुवात केली. महारोग्यांसाठी कुष्ठधाम बांधलेत. निराधार आश्रम, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, वृद्धाश्रम, पाळणाघर उभे केलेत. यात्रेच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी घाट आणि धर्मशाळा बांधल्या. सन १९५२ साली गाडगे महाराज मिशनची स्थापना झाली आणि तिचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. मिशनतर्फे चालविल्या जाणार्या शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी लाभ घेताहेत. जे सुशिक्षीतांना जमले नाही ते एका अशिक्षित परिवर्तनवाद्याने करुन दाखविले आहे. यासंबंधी लेखकाने अत्यंत गंभीरपणाने लिहिले आहे.
शेवटी लेखकाने गाडगेबाबांचे कीर्तन व आजच्या लफंग्या बाबांचे एकूणच आजचे कीर्तन याची सम्यक तुलना निमलवार यांनी केली आहे, जी याआधी आलीच आहे. सामाजिक विषमतेवर प्रहार आणि शिक्षणप्रसाराचा तसेच गाडगेबाबांच्या सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा हेतू काय होता याबाबत चिंतनशील परिशिष्टे शेवटी जोडली आहेत. संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा तपशीलही शेवटच्या दोन पानांवर आलेला आहे. गाडगेबाबांनी अडाणी असूनही अशिक्षित भोळ्याभाबड्या जनतेला शहाणं करण्यासाठी खरे ज्ञान प्रबोधनाच्या माध्यमातून देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचा सोपा मार्ग अवलंबत स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून जगाच्या कल्याणासाठी अर्धे आयुष्य घालवले.
अशा निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी माझ्यासारखा लहान माणूस त्यांच्या जीवनात व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडू शकत नाही हे लेखकाने प्रामाणिकपणे म्हटले आहे. पण त्यांची विचारसरणी लहानपणापासूनच लेखकांत रुजल्यामुळे त्यांच्याविषयी महाराष्ट्रातील नामवंत लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचून झाल्यावर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्याचा संदर्भही लेखकाने दिला आहे. परंतु स्वयंदिप प्रकाशनाने आपली इतर प्रकाशने लगेचच द्यायला नको होती. ते पान या लेखकाच्या वणवण भटकून गोळा केलेल्या माहितीचे सारणीकरण असल्याचे भासते. तरीही झालेल्या अत्यंत कमीत कमी चुका वगळता अत्यंत स्वयंस्पष्ट छपाई आणि सुबक बांधणीमुळे पुस्तकाचा दर्जा उंचावला आहे.
लेखक गंगाधर निमलवार यांनी सदरील पुस्तकाचे लेखन दहावर्षांपूर्वी केलं होतं हे त्यांनी मनोगतात म्हटलंय. त्याचं काय कारण होतं हे वाचणं आवश्यक आहे. ऋणमोचनला गाडगेबाबा दरवर्षी जात असत. तिथूनही लेखकाला बरीच माहिती मिळाली आहे. संवादफेक, प्रसंगाचे वर्णन यांची भाषावस्था लेखकाला चांगलीच जमली आहे. 'डेबू पोलाद झाला होता', 'ढेकळाचं पाणी पिलाय', 'शून्यावर शून्य वाढविला. मामाला शून्यात बुडविला', 'जगाचा संसार सुखी करण्यासाठी स्वतःच्या संसाराचा निरोप घेऊन.' अशी काही वाक्ये काळजातून निघालेल्या भाषेला अलंकाराने सजवित आपल्याला काही ठिकाणी भेटतात. शब्दांची बजबजपुरी न माजवता साध्या आणि सोप्या शब्दात राष्ट्रसंताचा हा खडतर जीवनप्रवास वाचकांसमोर आणण्यात लेखक यशस्वी झाला आहे. प्रकाशक सुमित जोगदंड असले तरी तब्बल २१ विविध शिक्षणशाखांतील पदव्या मिळविलेल्या विद्वान डॉ. बबन जोगदंड या पुण्याच्या यशदातील विचारवंत अधिकाऱ्याने या पुस्तकाला म्हणजेच गाडगेबाबांच्या संक्षिप्त जीवनपटाला दीड पानांची प्रस्तावना देऊन पुस्तकाच्या सौंदर्यात भर टाकली आहे. लेखक सद्या हदगाव मध्ये केंद्रप्रमुख आहेत. सततच्या कार्यमग्नेतेमुळे चिंतनाला वेळ मिळत नाही. लिखाणालाही नाही. लेखकात जी प्रतिभा आहे, ती दाबून ठेवू नये. त्यांनी लिहावे. पुढील लेखनप्रवासास मंगल कामना चिंतितो आणि थांबतो.
- गंगाधर ढवळे, नांदेड. (समीक्षक) मो. ९८९०२४७९५३.
पुस्तकाचे नांव - संत गाडगेबाबा : जीवन व कार्य
लेखक - गंगाधर निमलवार, नांदेड. प्रकाशक - स्वयंदिप प्रकाशन, पुणे. पृष्ठे - १०४, किंमत - ₹ १५०/-.