पेठवडज येथील नागरिकांचे जिल्हा परिषद मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच आमरण उपोषण
नांदेड| कंधार तालुक्यातील पेठवडज येथील गावात शाळेला इमारत बांधकामासाठी शेष निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी पेठवडज येथील नागरिकांनी आज नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत आमरण उपोषण केले आहे.
कंधार तालुक्यातील पेठवडज गाव परिसरातील लोकसंख्येने मोठे गाव असून या गावालगत 20 ते 25 छोटी छोटी गावे येतात. या गावात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. अगदी निजाम काळापासून या ठिकाणी ही शाळा असून त्या काळामध्ये या शाळेच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. सदरील शाळा अतिशय जीर्ण झाली असून त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी सदर जीर्ण शाळेच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या दहा टक्के शेष निधी उपलब्ध करून द्यावा.
करून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने गावकऱ्यांनी शाळेच्या इमारत बांधणीच्या शेष निधी मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या मागणीसाठी आज पेठवडज येथील नागरिकांनी थेट नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठले. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ह्या कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड यांच्या नेतृत्वात सदरील अमरण उपोषण केले गेले असून जोपर्यंत या संदर्भाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा पेठवडज येथील नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य शिवाजी मेकवाड, गोविंद, घुमलवड, दत्ता गायकवाड, बळीराम पाटील, आनंद लोहबंदे, गंगाधर गायकवाड, एकनाथ डावकोरे, शिवाजी करेवाड, रमेश कांदिलवाड आनंद बंदेवाढ, विनायक कोरेमवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
