नांदेड च्या स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेला मेस्टा चा बेस्ट स्कूल पुरस्कार -NNL


नांदेड।
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे नुकतेच महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांची संघटना, मेस्टा (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) चे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात नांदेड च्या स्वामी विवेकानंद स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेला राज्यस्तरीय बेस्ट स्कूल अवॉर्ड, बेस्ट प्रिंसपल अवॉर्ड आणि कोरोना काळात शाळेने सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेत कोरोना योद्धा म्हणून  सन्मानित करण्यात आले. 

शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री सचिन अहिर,  ऑस्ट्रेलियन शिक्षण तज्ञ, मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्वामी विवेकानंद स्कूल ऑफ स्कॉलर्स ही शाळा मागील 14 वर्षापासून आनंददायी आणि तणावमुक्त शिक्षणासाठी ओळखली जाते. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेची श्री श्री रविशंकर बाल मंदिर या पूर्व प्राथमिक शाळेपासून सुरू झालेली शाळा आता स्वामी विवेकानंद स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या माध्यमातून आनंददायी शिक्षण व उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. 

शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अनेक उपक्रम राबविते. शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल   शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीतल पांडे - होकर्णे यांना बेस्ट प्रिंसीपल पुरस्कार आणि कोरोना च्या बिकट परिस्थितीत शाळेने पालकांना  समजून घेतले त्याच बरोबर कोरोना मुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे छत्र हिरावून घेतल्या गेले त्यांना जोपर्यंत विद्यार्थी शाळेत आहे तोपर्यंत कुठलीही फिस लागणार नाही अशी भूमिका घेतली व ती अंमलात ही आणली याबद्दल ही शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पांडे याना कोरोना योद्धा या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

 शाळा व्यवस्थापनाने टाकलेला विश्वास आणि सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना मुख्याध्यापिका शितल पांडे यांनी व्यक्त केली. मेस्टाच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून इंग्रजी शाळा संचालकांनी हजेरी लावली होती. इंग्रजी शाळा खूप छान काम करत आहेत त्यांच्या मागण्या रीतसर असून त्या सोडविण्यासाठी आपण निश्चितपणे सकारात्मक प्रयत्न करू आणि काही दिवसातच तुम्हाला हे दिसून येईल अशा शब्दात शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी इंग्रजी शाळा संचालना आश्वस्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी