पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : ना. आदिती तटकरे
पत्रकारांना डिजीटल पत्रकारितेचे रूप अंगीकारावे : एस.एम.देशमुख
रायगड/माणगांव। शहरी भागापेक्षा ग्रामिण भागातील पत्रकारिता ही खरी सजग पत्रकारिता आहे. मात्र आजच्या काळात केवळ पत्रकारिता करून आपले कुटुंब चालविणे अशक्य असल्याने पत्रकारांनी या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य कौशल्य जाणून घेणे गरजेचे असल्याचा मौलिक सल्ला ज्येष्ठ माध्यमकर्णी समीरण वाळवेकर यांनी दिला. पत्रकारांची पेन्शन, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी आदी प्रश्न सोडवण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल असे आश्वासन रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी दिले.
रायगड प्रेस क्लबच्या १६ व्या वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा रायगड प्रेस क्लब व माणगांव प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने माणगांव येथील कुणबी भवन येथे आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ माध्यम कर्णी समीरण वाळवेकर व प्रमुख अतिथी म्हणून ना. आदिती तटकरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक एस.एम. देशमुख होते. व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद सचिव विजय मोकल, मेघराज जाधव, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, माजी अध्यक्ष अनिल भोळे, अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकामध्ये भारत रांजणकर यांनी एस.एम.देशमुख यांनी तरुण पत्रकारांना एकत्र करून २००५ साली रायगड प्रेस क्लबची स्थापना केली. गेली १६ वर्षे विविध सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न संघटनेमार्फत केला जात आहे.घोणसे घाट, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आंदोलन, महामार्गाचे बाळ शास्त्री जांभेकर महामार्ग नामकरण, पाणीटंचाई निवारणासाठी उपक्रम, बांधावर जाऊन शेतकरी सन्मान असे उपक्रम संघटनेने राबवले आहे. रायगड प्रेस क्लबने सुरु केलेला बांधावर जाऊन शेतकरी सन्मान हा उपक्रम शासनाने सुरु केला हे प्रेस क्लबचे यश आहे असे सांगितले.
एस.एम.देशमुख यांनी आजही पत्रकारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित असून माहिती खात्याच्या मंत्री म्हणून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. ३०० ज्येष्ठ पत्रकारांना जरी पेन्शन सुरु झाली असली तर आणखी ३०० पत्रकार शासनाच्या जाचक अटी व शर्ती यामुळे पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. पत्रकारांवरील हल्ले वाढत असून पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याची अंमलबजावणी होत नाही असे सांगितले. मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नांव शासनाने द्यावे या मागणीसाठी १७ मे रोजी राज्यभरात तालुकास्तरावर आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली.
ना. आदिती तटकरे यांनी देशमुख यांच्या मागणीचा संदर्भ देत पत्रकार पेन्शन योजनेसाठी असणारा ३० वर्षाचा अनुभव कमी करून तो २८ वर्ष असा केला आहे त्यासाठी ३५ कोटीची तरतूद केली आहे.त्याच बरोबर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
समीरण वाळवेकर यांनी वृत्तपत्र मालकांमध्ये भांडवलदारांचा दबाव गट निर्माण झाल्याने आताचा काळ हा पत्रकारांसाठी कठीण काळ आहे.पत्रकारिता म्हणजे कष्टाच्या भाकर्या भाजण्याचे काम झाले आहे. सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वसामान्यालाही आपली मते मांडता येऊ लागली आहेत. त्यामुळे पत्रकारांनाही आपल्यात बदल करायला हवे. जाहीराती हा वृत्तपत्राचा श्वास झाला असून या जाहीरात गोळा करण्याचा भार पत्रकारांवर येऊन पडत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता त्याच्याशी निगडीत अन्य कौशल्य जाणून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला वाळवेकर यांनी दिला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार सन्मान पुरस्कार व विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक अजित वरपे ( संपादक दैनिक झुंजार नेता बीड ), जीवन गौरव पुरस्कार विजय मांडे कर्जत, स्व. निशिकांत जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मेघराज जाधव मुरुड, उदय कळस म्हसळा, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार प्रफुल्ल पवार अलिबाग, स्व. संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार हरेश मोरे साई, सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार सीमा मोरे, उत्कृष्ट छाया चित्रकार पुरस्कार प्रकाश माळी पेण, प्रसाद पाटील महाड , श्रमिक पुरस्कार नंदकुमार मरवडे रोहा, आनंद पवार रसायनी, संतोष शिलकर श्रीवर्धन, एस.टी. पाटील खालापूर यांना देण्यात आला.
तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार संजय अण्णा ढवळे, बाबुशेठ खानविलकर, आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. इस्माईल रहाटविलकर, यशस्वी मराठी उद्योजक पुरस्कार दिपक जाधव, संतोष वरपे, डॉ. संजय सोनावणे यांना प्रदान करण्यात आला. सुत्रसंचलन सुधीर शेठ तर आभार कार्याध्यक्ष मनोज खांबे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माणगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, पदमाकर उभारे, गौतम जाधव, पुनम धुमाळ आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.