नांदेड| महावितरण परिमंडळ नांदेड येथील कर्मचारी (यंत्रचालक) विजय तुकाराम रणखांब यांना महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाचा सन २०१९ चा गुणवंत कामगार पुरस्कार मुंबई येथे राज्याचे कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल त्यांचा राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संघटना नांदेड जिल्ह्याच्यावतीने दि. २७ एप्रिल २०२२ बुधवार रोजी भावसार चौक, मंत्रीनगर नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे यांच्या हस्ते पुष्पहाराने हृदय सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तथा एसटी मेकॅनिक सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, जिल्हा सचिव पंडीत तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष रामदास पेंडकर, जिल्हा संघटक रामसिंह ठाकूर, भाई प्रकाश वागरे, सोपान काळे, शेख सलीम, संजय काकडे, नारलावार, राजकुमार सिंदगीकर उपस्थित होते.
यावेळी गुणवंत एच. मिसलवाड यांनी विजय रणखांब यांच्याप्रती आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, विजय तुकाराम रणखांब यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये तन-मन- धनाने खूप मोठं योगदान दिले असून कार्य करुन आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. ते अनेक सेवाभावी संघटनेत कार्यरत असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्यामुळे शासनाने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानीत केले आहे. याचा आम्हाला खूप मोठा आनंद असून विजय रणखांब यांची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या नांदेड जिल्हा कार्यकारीणीवर लवकरच नियुक्ती केली जाईल असे प्रतिपादन करुन त्यांना भावी कार्यास वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या. यावेळी पंडीत तेलंग यांनी सर्वांचे आभार मानले.