अंत्यसंस्कार करताना नागरिकांना करावा लागतोय अंधाराचा सामना
लाखो रुपये खर्चूनही नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बसतो फटका
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील नगरपंचायतीने मागील २ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून शहरातील अनेक भागासह लकडोबा चौकातील हिंदू स्मशान भूमीत पथदिवे बसविले. मात्र अल्पवधीतच हे बंद पडल्यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय नुकतेच अपघाती निधन झालेल्या विनोद काळे याच्या अंत्यसंस्कार दिवशी शहरातील नागरिकांना आला आहे. यावरून नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाचा फटका शहरवासीयांना आयुष्यभर सहन करावा लागतो कि काय..? असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे.
मरणानंतर तरी प्रेताला चिरशांती लाभावी आणि स्वर्गात जागा मिळावी अशी अपेक्षा सर्वाना असते. त्यासाठीचा प्रत्येक गावात शहरात स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्ता म्हणजे स्मशान भूमीचे सुसज्ज बांधकाम आणि सजावट व विजेसह पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. यासाठी हिमायतनगर नागरपंचायती अंतर्गत लाखोंच्या निधीतून शहरातील स्मशान भूमीत विकास कामे करून रात्रीला दिवसाचा प्रत्यय यावा यांसाठी पथदिवे बसविण्यात आली आहेत. मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे नपच्या यंत्रणेकडून करण्यात आलेल्या विविध विकास कामात मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यात सत्ताधार्यांनी कोणतीही कसर सोडली नसल्याचे यावरून दिसते आहे.
शासनाच्या निधीत करण्यात आलेल्या भ्रष्टाचारामुळे नगरपंचायतीकडून मरणानंतरही होणार छळ थांबत नसल्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे समोर आले आहे. स्मशान भूमीशी संबंधित प्रश्नांवर नगरपंचायत यंत्रणेकडून होणारे दुर्लक्ष हिमायतनगर शहरातील नागरिकांचा संयम सोडण्यात कारणीभूत ठरत आहे. असाच अनुभव हिमायतनगर (वाढोणा) येथील परमेश्वर गल्लीतील रहिवाशी तथा युवा शेतकरी विनोद शंकर काळे वय ३० वर्ष यांचे दि.२५ एप्रिल रोजी शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने अपघाती निधन झाले. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक व शेजा-यांनी हिमायतनगर येथील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू स्मशान भूमीत रात्रीला ७.३० वाजता अंत्यसंकारासाठी नेण्यात आले. यासाठी शहरांसह जिल्ह्यातील महिला - पुरुष नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. मात्र येथील स्मशान भूमीत सर्वत्र काळोख पसरलेला होता. त्यामुळे प्रेताचे अंत्यसंस्कार कार्यक्रम उरकताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. स्मशान भूमी परिसरात केरकचरा ओबढधोबड जमीन असल्याने प्रेताच्या ठिकाणी जाऊन अंतिम दर्शन घेणार्यांना अडखळत जावे लागले आहे.
यात काही वृद्धांना अडचण येत असल्याने अंत्यविधीला उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबइलच्या बैटरी लावून कसेबशी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. मात्र या ठिकाणी उपस्थित झालेल्या अनेकांनी स्मशान भूमीत पथदिवे नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा असताना देखील बंद असल्याने नाराजी व्यक्त केली. तर नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा व दुर्लक्षित कारभाराबाबत रोष व्यक्त केला आहे. लाखो रुपये खर्चुन स्मशान भूमीचा विकास झाला असताना अंधारात प्रेताचे अंत्यसंस्कार करावे लागते म्हणते यापेक्षा मोठे दुर्दैव काय...? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
स्मशानासाठी लाखो रुपये खर्च करूनही एखाद्या खंडर जागेत अंत्यसंस्कार करावा लागत असल्याचा अनुभव उपस्थितांना आला आहे. खरे पाहता स्मशान भूमीत मोफत दफन व दहन विधी, स्मशानभूमी दुरुस्ती व इतर व्यवस्था, स्मशानात उद्यान व्यवस्था, रात्रीला अंत्यविधी होण्यासाठी विजेची व पाण्याची सोय, तसेच नगरपंचायतीने ठेकेदार नेमून प्रेतांच्या अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे, रॉकेल उपलब्ध करणे, आदी सेवा देणे क्रमप्राप्त आहे. परंतु हिमायतनगर नगरपंचायत होऊन ७ वर्ष झाली तरी साधी वीज आणि पाण्याची सोय सुद्धा सुरळीत दिली जात नसल्याचे दिसते आहे. आवश्यकता नसलेल्या ठिकाणी विजेची सोय आहे, मात्र अंत्यसंस्कार ठिकाणी लावण्यात आलेली दिवाबत्ती नादुरुस्त असल्याने मरणानंतर प्रेताची अवहेलना होत आहे.
स्मशानाबाहेरील भागात दिवसा नगरपंचातीचे पथदिवे सुरू असताना स्मशान भूमीत मात्र नेहमी अंधार असतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणी निर्माण होत आहेत. येथे सर्व सुविधा उपलब्ध करता येत नसल्या तरी किमान रात्रीच्या वेळी दिवाबत्तीची तरी सोय सुरळीत चालू राहावी अशी रास्ता अपेक्षा नागरिकांना आहे.