नांदेड| श्री संत रोहिदास महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार लातूर जिल्ह्यातील प्रतिथयश शेतकरी धोंडीराम सावळा सुर्यवंशी मळवटीकर यांना नुकताच श्री संत रोहिदास तिर्थक्षेत्र बळीरामपूर, नांदेड येथे संस्थापक वामनराव विष्णुपूरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री धोंडीराम सावळा सुर्यवंशी मळवटीकर रा. लातूर हे प्रगतीशील शेतकरी असून आत्तापर्यंतच्या काळात ते अनेकविध क्षेत्रात सहाय्यकारी ठरलेले आहेत. विशेषतः त्यांनी वंचित, दुर्लक्षीत समाजातील अनेक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याची मदत केलेली आहे. तसेच ते अन्नदानाच्या क्षेत्रातही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेऊन पुरस्कार निवड समितीचे सदस्य अशोक लाठकर, गंगाराम विष्णुपूरीकर, प्रा. व्यंकटराव वाघमारे, डॉ. विवेक पदमणे, दलितमित्र चंद्रकांत घोडजकर, संभाजी जाधव पाटील, ऍड. प्रमोद कामठेकर, वर्षाताई जमदाडे, गुंडप्पा बारोळे, इंद्रजीत पांचाळ यांनी घेऊन त्यांच्या शिफारशीनुसार इ.स. २०२० च्या श्री संत रोहिदास महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
श्री संत रोहिदास तिर्थक्षेत्र नांदेडचे संस्थापक वामनराव विष्णुपूरीकर यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, विजयचिन्ह, गुरु महाराज यांचा पवित्र ग्रंथ, ओळखपत्र असे आहे. धोंडीराम सावळा सुर्यवंशी यांना सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.