नांदेड| पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती दिवसेंदिवस सर्वसामान्यांना न परवडणार्या होत आहेत. सरकारी यंत्रणांची पेट्रोलजन्य पदार्थांच्या विक्रीवरील नफेखोरी बंद केल्यास महागाईवर आपोआप नियंत्रण येईल त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरील नफेखोरी तत्काळ बंद करावी, अशी मागणी नांदेड भाकपचे ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी केली आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती कमी कराव्यात या मागणीसाठी डाव्या आघाडीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. नांदेड येथे डावी लोकशाही आघाडीच्यावतीने आयटीआय जवळील पेट्रोल पंपासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर म्हणाले की, पेट्रोलजन्य पदार्थाच्या दरवाढीत केवळ जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती किंवा रशिया-युक्रेन युद्ध या परिस्थितीसह केंद्र व राज्य सरकारांची पेट्रोलजन्य पदार्थांच्या विक्रीतून कराच्या माध्यमातून होणारी नफेखोरी जबाबदार आहे.
पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्या की सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर आपोआप परिणाम होतो. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलजन्य पदार्थांवरील सर्व कर कमी करुन वाढत्या महागाई पासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना ज.द.चे किरण चिद्रावार यांनी सत्ताधारी व इतर विरोधी पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्या ऐवजी भावनिक मुद्यांवर लोकांचे लक्ष परावृत्तीत करीत आहेत. शासन यंत्रणेने महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. उज्ज्वला पडलवार, कॉ.देवराव नारे, कॉ.गणेश संदुपटला, करवंदा गायकवाड, कॉ.मिना आरसे, कॉ. लता गायकवाड, कॉ.दिगंबर घायळे यांच्यासह इतर सहभागी झाले होते.