हदगाव, शे.चांदपाशा| खासदार हेमंत पाटिल यांच्या पाठपुराव्यामुळे इसापुर धरणातुन उजव्या कालव्यात दि. २६ सोमवारी पाणी सोडण्यात आले आहे. पैनगंगा नदिकाठावरील पाणी प्रश्न आता सुटण्यास मदत झाल्याने नदिकाठावरील गावच्या नागरीकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील विदर्भ मराठवाड्याची जलवाहिनी असलेली पैनगंगा नदि कोरडीठाक पडली आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनावरांना पिण्यासाठी कुठे पाणी उपलब्ध नाही, परीनामी जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, पैनगंगा नदिवर असलेला हदगाव तालुक्यातील हरडफ, हिमायतनगर तालुक्यातील गांजेगाव बंधारा कोरडा पडला आहे, पैनगंगा नदिकाठावर असलेल्या उमरखेड तालुक्यातील ४२, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अंदाजीत ६० अशा १०२ गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे महिलांसह अबालवृध्दांना पिण्याच्या पाण्या करीता पायपीट करावी लागत आहे.
नदिकाठावरील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्या बरोबर, जनावरांची तहान भागवण्यासाठी पैनगंगा नदि पात्रात इसापुर धरणातुन पाणी सोडण्यासाठी खासदार हेमंत पाटिल यांचेकडे अनेक नागरीकांच्या भ्रमणध्वनी वरून तक्रारी आल्यावर खासदार पाटिल यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नांदेड व यवतमाळ यांना या पुर्वी सुचना करून दि. २१ गुरूवारी पत्रव्यवहार केला. त्यानंतर दि. २६ सोमवारी इसापुर धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. उद्या पर्यंत किंवा एक दोन दिवसात हदगाव - हिमायतनगर उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदि पात्रात पाणी पोहचने अपेक्षीत आहे.
पैनगंगा नदीपात्रात पाणी नसल्याने नदीकाठावरील गावकर्यांना आणि मुक्या जनावरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे लक्षात येताच इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी मागील महिन्यात शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन नांदेड याना निवेदन देऊन तात्काळ नदीपात्रात इसापूर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली होती हे विशेष.