नांदेड| शहरातील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञाताने दुचाकीवरून येऊन भरदिवसा गोळीबार केल्याची घटना सकाळी घडली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नुकतेच त्यांना देण्यात आलेली सुरक्षा काढण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने नांदेड शहरात हल्लेखोरांची दहशत निर्माण झाली असून, हल्लेखोरांना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे सकाळी फिल्डवर्कवर जाऊन ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले होते. ते गाडीतून खाली उतरत घरात जात असतांना त्यांच्या पाठीमागून पाळत ठेऊन आलेल्या दुचाकीवरील अज्ञातांनी समोरून येऊन बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या मेंदूला लागून गेली, तसेच त्यांचा चालकही या गोळीबारात जखमी झाला आहे. हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आलेले असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले जात आहेत.
गंभीर जखमी झालेल्या संजय बियानीसह चालकाला तातडीने खाजगी रुग्णालयात दखल केले. त्यांचेवर उपचार सुरु असताना संजय बियाणी यांची दुपारी १ वाजेच्या दरम्यान प्राणज्योत मालवली. संजय बियाणी यांचेवर कोणी गोळीबार केला..? कश्यासाठी केला..? याच कारण अद्यापतरी अस्पष्ट असले तरी बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर असून, त्यांच्यावर खंडणीच्या वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाला असावा..? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
मागील काळात काहींनी त्यांना खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच गुंडानी त्यांच्या कार्यालयात येऊन खंडणी मागितली, मात्र त्यांनी मोठ्या चतुराईने खंडणी मागणीसाठी आलेल्याना मी संजय बियाणी नव्हे असे सांगून ती वेळ टाळली. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंत्तू काही दिवसापूर्वीच त्यांचा सुरक्षक रक्षक काढण्यात आल्यानंतर आज गुंडानी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. एकूणच या घटनेमुळे नांदेड शहरातील व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.
हल्लेखोरांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, यात त्यां दोन अज्ञातांनी बियाणी यांचेसमोर येऊन गोळ्या झाडल्याचे दिसते आहे. त्यामुळे संजय बियाणी हे जमिनीवर पडले असल्याचे दिसत असून, हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत.