नांदेड| शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर स्वतःच्या घरापुढे गाडीतून बाहेर निघत असतानाच अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला आहे. या घटनेत बियाणी यांच्या मेंदूवर गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून, पुन्हा एकदा नांदेड शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाहेरून आपल्या घरी परतलं होते. गाडीतून खाली उतरत असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञातांनी बंदुकीतून ४ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संजय बियाणीं यांच्या मेंदूला 1 गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांचे चालकही यात जखमी झाले. घरासमोर रक्ताचा सडा पडल्याचे पाहावयास मिळते आहे. त्यांच्यावर नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे संगणयात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे सूचनेवरून अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व निरीक्षक यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. घटनेच्या तपासाला गती आली असून, या भागातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. घटनेच्या ठिकाणी पिस्तुलाच्या गोळ्या सापडल्या असून, त्यात काही जिवंत गोळ्या असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहिपर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
संजय बियाणी यांचेवर कोणी गोळीबार केला..? कश्यासाठी केला..? याचा कारण अद्यापतरी स्पष्ट झालं नाही. या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर असून, त्यांच्यावर खंडणीच्या वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार करण्यात आला असावा..? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नांदेड शहरात मागील अनेक महिन्यापासून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांचीच संख्या वाढली असल्याने स्थागुशाने केलेल्या विविध कार्यवाहीतून पुढे आले आहे. त्यामुळे नांदेड शहर हे गुन्हेगारीच्या दिशेने वळत असं, अश्याच घटना घडत राहिल्या तर नांदेडचा बिहार व्हायला उशीर लागणार नाही असेही बोलले जात आहेत.