नांदेड/भोकर| भोकर तालुक्यात स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक गावात उत्कृष्ट काम होत आहेत.यामुळे गावांचा कायापालट होताना दिसून येतो.यापुढे स्मार्ट व्हिलेज म्हणून पुढे येणाऱ्या गावांना निधी कमी पडू देणार नाही,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
भोकर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज गावांतील सरपंच व ग्रामसेवक यांची आज दि.२६ एप्रिल रोजी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नामदेव केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोकर तालुक्यातील २१ पेक्षा जास्त गावांनी स्मार्ट व्हिलेज मोहिमेत सहभागी होऊन ही मोहीम गतिमान केली आहे.या मोहिमेत सहभागी होऊन भोकर तालुक्यातील अनेक गावांनी कौतुकास्पद कामे केली आहेत. यापुढे स्मार्ट गावांचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.या बैठकीला भोकर तालुक्यातील हाडोळी, नागापूर,नारवट,खडकी,कोळगाव, धावरीसह तालुक्यातील पंधरा गावातील सरपंच व ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
भोकर तालुक्यातील गावांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे भेटी देणार आहेत.मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात खडकी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्रमदान करणार असून तालुक्यातील स्मार्ट गावांना भेटी देऊन कामांची पाहणी त्या करणार आहेत.
