भिक्खू संघाचे म. फुले यांना अभिवादन ; पंय्याबोधी यांच्या हस्ते महाबुद्धवंदना आज
नांदेड| ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दांपत्यांनी समाजातील विद्यावंचितांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज सर्वच स्तरातील मूले मुली शिक्षण घेऊ शकतात. यामागे फुले दांपत्याचा महान त्याग आहे, कष्ट आहेत. जयंती साजरी केली की आपण जबाबदारीतून मुक्त झालो असे वाटत असेल तर ते योग्य नाही. फुले दांपत्यानी पेटविलेली शिक्षणाची ज्योत सतत तेवत ठेवा असे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या भिक्खू संघाने म. फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले. शहरातील म. फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू संघ, प्रफुल्ल सावंत, सुखदेव चिखलीकर, यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वंचितच्या वतीने चार दिवसीय सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९.०० वा. भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या हस्ते महाबुद्धवंदना संपन्न होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सर्व बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.