सप्तरंगी साहित्य मंडळाचे कविसंमेलन रंगले; वनिता विकास महिला मंडळाचा पुढाकार
नांदेड| स्वातंत्र्य मिळाले रयतेला आनंद झाला गगनाला, स्वातंत्र्य मिळाले इंदिराजींना आणि चायवाल्या मोदीजींना...! तमाम जनतेचे कल्याण साधणारा आणि स्वातंत्र्य मूल्य कशाप्रकारे रुजत गेले हा आशय अभिव्यक्त करीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारी कवी थोरात बंधू यांची कविता सादर झाली. अशा अनेक चिंतनशील कवितांनी सप्तरंगी साहित्य मंडळाचे कविसंमेलन रंगले.
कलामंदिर शेजारी असलेल्या गायन वादन महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब गुंजकर सभागृहात संपन्न झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्तंभलेखिका तथा कवयित्री रुपाली वागरे वैद्य ह्या होत्या. उद्घाटक अॅड. संजय भारदे, स्वागताध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर, समिती प्रमुख मारोती कदम यांची उपस्थिती होती.
शहरातील वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने शिवरत्न आणि हिरकणी पुरस्कारांचे वितरण धर्मभूषण दिलीप ठाकूर, अॅड. डॉ. मुकुंदराज पाटील, जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भास्कर हंबर्डे, टायगर सेनेचे बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे उपाध्यक्ष नागोराव डोंगरे यांची प्रमुख उपस्थितीत झाले. तत्पूर्वी झालेल्या कविसंमेलनात जितेंद्र लोणे, गणपत माखणे, थोरात बंधू, सुजाता पोपुलवार, रुपाली वागरे वैद्य, प्रकाश ढवळे नागलगांवकर, मारोती कदम, प्रज्ञाधर ढवळे, आम्रपाली येरेकर, शांता राठोड, छाया कांबळे, अर्चना तोमर, गंगाधर सोळंके, साईनाथ रहाटकर आदींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप व पूष्पपूजन करण्यात आले. सन २०२२ करिता विविध क्षेत्रातील कार्यरत पुरुषांना शिवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर महिलांना हिरकणीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक वनिता विकासच्या अध्यक्षा वंदना घुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सोळंके यांनी तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. आभार प्रगती भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.