उन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल? उष्णतेची लाटः मुकआपत्ती -NNL


साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान हे तीन अंश सेल्सियसने अधिक असेल किंवा सलग दोन दिवस 45 अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असेल अशा स्थितीला उष्णतेची लाट असे संबोधले जाते.

वातावरणातील बदलांमुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी उष्णतेच्या पाच ते सहा लाटा येतात. हे प्रमाणही वाढते आहे. 1992 ते 2015 या काळात आपल्या देशात 22 हजार 562 लोकांना उष्णतेच्या लाटेमुळे जीव गमवावा लागला आहे. या सोबतच पक्षी, प्राणि, वनस्पती यांची हानीही मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती मानली जाते. त्यामुळे होणारे नुकसानही मोठे असते.

वातावरणाचे तापमान 37 अंश सेल्सियस असेपर्यंत मानवाला काही त्रास होत नाही. त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते. त्याचे विपरित परिणाम मानवी शरीरावर होतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदा. प्रत्यक्ष तापमान 34 अंश सेल्सियस असेल पण आर्द्रता 75 टक्के असेल तर तापमान निर्देशांक 49 अंश सेल्सियस इतका असतो म्हणजे व्यक्तिला ते तापमान 49 अंश सेल्सियस इतके त्रासदायक ठरते.

कृती योजना आणि कलर कोडिंग - त्यासाठी उष्णतेची लाट आणि त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी उष्मा प्रतिबंधक कृती योजना आखणे आवश्यक असते. या कृति योजनेत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे- उष्णतेची लाट ही एक आपत्ती आहे हे मान्य करणे, या लाटेमुळे ज्यांचे नुकसान होणार आहे असे समाजगट ओळखणे, सार्वजनिक थंडाव्याच्या जागा निर्माण करणे, विविध माध्यमांद्वारे उष्णतेच्या लाटेबाबत सावधानतेचे इशारे समाजाला देणे.

हवामान विभागामार्फत वेळचेवेळी असे संदेश दिले जातात. त्यासाठी कलर कोडिंग पद्धत वापरणे सुरु केले आहे. पांढरा रंग- सामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान), पिवळा रंग- उष्ण दिवस(नेहमीच्या कमाल तापमाना एवढे तापमान), केशरी रंग- उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट(नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियस जास्त तापमान), लाल रंग- अत्यंत उष्ण दिवस(नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान)

अतिजोखमीच्या गटांची काळजी - उष्णतेच्या लाटेचा धोका ज्या व्यक्तिंना आहे त्या व्यक्तिंमध्ये उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती, लहान बालके, मुले, स्थूल व्यक्ति, अयोग्य परिधान केलेले लोक, पुरेशी झोप न झालेल्या व्यक्ति, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असणारे लोक, काही विशिष्ट औषधी घेत असलेले लोक, बेघर लोक इ. गटांतील लोकांचा समावेश होतो. या अतिजोखमीच्या गटातील लोकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच समाजातील इतर घटकांनीही या लोकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक सुविधा निर्मिती आवश्यक- उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ ते गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासाच्या स्वरुपात शरिरावर उष्णतेमुळे रॅशेश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास असतो. गंभीर प्रकारात उष्माघात होतो. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. उष्णता लाटेस प्रवण भागात खालील प्रमाणे सार्वजनिक सुविधांची निर्मिती करणे आवश्यक असते.

1) सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे (उदा. बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजार, धार्मिक ठिकाणे, बॅंका, प्रेट्रोल पंप, मुख्य रस्ते इ.)

2) लोकांना थांबण्यासाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.

3) सार्वजनिक उद्याने, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवणे.

4) छतांना उष्णता विरोधी रंग लावणे.

5) कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या कामकाजाच्या वेळा बदलविणे.

6) उष्णतेपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत लोकांचे प्रबोधन करणे.

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी….    हे करा-

1) पुरेसे पाणी प्या. प्रवास करत असाल तर पाणी सोबत ठेवा.

2) हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

3) उन्हात जातांना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा.

4) पाळीव प्राण्यांचा सावलीत, थंडाव्याच्या ठिकाणी ठेवा.

5) ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

ष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी..... हे करु नका-

1) शक्यतो उन्हाच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळा.

2) कष्टाची कामे उन्हात करु नका.

3) पार्क केलेल्या वाहनात मुलांना ठेवू नका.

4) गडद रंगाचे व तंग कपडे वापरु नका.

5) उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

6) मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

7) खूप प्रथिने युक्त अन्न तसेच शिळे पदार्थ खाऊ नका.

यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपापल्या स्तरावर तसेच सर्व यंत्रणांनी मिळून सहयोगाने उपाययोजना कराव्या. नागरिकांपर्यंत सुचना पोहोचवून त्यांना सावध करणे ही आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला, संदर्भःउपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी