नांदेड जिल्हा राज्यात पहिला; देशात पहिला आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसली कंबर
नांदेड| सध्या देशभरात काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नाेंदणी सुरु आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने डिजिटल सभासद नाेंदणीची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. नांदेड जिल्हा डिजिटल सभासद नाेंदणीत सध्या राज्यात पहिला आहे. पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा देशात पहिला आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे.
काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नाेंदणी मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या नाेंदणीस देशभरातून माेठा प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल नाेंदणी करत असताना येणाऱ्या अडचणींना ताेंड देत कार्यकर्त्यांनी माेठ्या प्रमाणात आतापर्यंत नाेंदणी केली आहे. 31 मार्च ही नाेंदणीची शेवटची तारीख हाेती. प्रशिक्षित झालेले कार्यकर्ते व मतदारांचा उत्साह लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने डिजिटल सभासद नाेेंदणी माेहिमेस 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या माेहिमेस उदंड प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत नांदेड जिल्हा राज्यात अव्वलस्थानी राहिला आहे. येेणाऱ्या काळात सभासद नाेंदणीचा आलेख असाच कायम ठेवून जिल्ह्याला देशात अव्वलस्थानी आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरापर्यंत जाऊन नाेंदणीचा वेग वाढवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा समन्वयक नारायण श्रीमनवार, नांदेड शहर समन्वयक विजय येवनकर यांनी केले आहे.