नांदेड| हो ला हो म्हणणारी. जे द्याल त्यात समाधान मानणारी अशी स्त्रीची प्रतिमा तयार केली आहे. घरादाराला सतत जपणारी स्त्री स्वतः स्वतःवर बंधनं घालते. व्यवस्थाही बंधनं घालते. बाईने जरा मोकळं व्हावं. तत्वाने जगावं. खूप वाचावं आणि लिहिता येईल ते लिहावं असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार मंगल खिवंसरा यांनी आज केले.
नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने उत्सव स्त्री जाणिवांचा या कार्यक्रमांतर्गत आज रविवार दिनांक 6 मार्च रोजी त्यांची प्रकट मुलाखत सुचिता खल्लाळ यांनी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांवरील अन्याय यासाठी कायदे खूप कडक आहेत. त्याची आपणास फारशी माहिती नाही. ही माहिती करून घ्यावी आणि अन्यायाला प्रतिकार करण्याचे शिकावे. अन्याय सहन करीत गेलो तर अन्याय करणारा सबळ होतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणी आपण त्याचा विरोध केला पाहिजे असे सांगून 2003-04 सालापासून वर्षा ठाकूर -घुगे या प्रशासनामध्ये राहून समाजसेवेचे काम करतात. प्रशासकीय अधिकारी देखील उत्कृष्ट समाजसेवक असतात त्यांचा आणि आमच्यासारख्या समाजसेवकांचे उद्दिष्ट एक आहे. अशा अधिकाऱ्यांच्या सहभागातून यशाचे अनेक प्रश्न सुटू शकतात.
नांदेड जिल्ह्यात मुलगी घराचा अभिमान या अंतर्गत सर्व घरांवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग झाला आहे. त्याचं कौतुक करून त्या पुढे म्हणाल्या की, यापुढे जाऊन घराच्या रजिस्ट्रीवर मुलाचं आणि मुलीचं दोघांचेही नाव राहावे. कुटुंबातील पैशावर मुलींचा देखील तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे तो अधिकार मिळाला पाहिजे या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी विशाखा समिती, महिलांचे प्रश्न, कायदे यासह पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव सांगितले.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मंगल खिवंसरा यांचा पुस्तक व बुके देवून सत्कार केला. उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी त्यांचा परिचय करून दिला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू आमदूरकर, डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, संतोष केंद्रे, राजश्री देशमुख, त्रिवेणी झाडे, संजीव मानकरी, शेख रुस्तुम, शिवानंद लांडगे, राजेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.